आवाज... आवाज...---- पु ल देशपांडे

Started by Prasad Chindarkar, December 10, 2009, 02:10:34 PM

Previous topic - Next topic

Prasad Chindarkar

आवाज... आवाज...

गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षात दुनिया बरीच बदलली. पण मला जाणवतो तो बदल मात्र आवाजांच्या दुनियेचा. किती आवाज हरवले. किती नवे आले. तंग तुमानी घालून रस्त्यातून हिंडणाऱ्या पोरींची जशी डोळ्यांना सवय होते तशी नव्या आवाजांची पण होते. पण रस्त्यातून सिगरेट ओढीत जाणाऱ्या कुंकू लावलेल्या बाईचं दर्शन जसं अजूनही धक्का देउन जातं तसं भल्या पहाटे 'मुझे बुढ्ढा मिल गया' चा विलाप कानी आला तरी धक्का बसतो. अर्थात माझी आवाजाची दुनिया संगीतापुरती मर्यादित नाही. हे आवाज. उघडेबंब आवाज. पहाटेशी कुणाचं नातं कोंबड्याच्या आरवण्याने जुळलेलं असेल.. कुणाचं जात्यावरच्या ओव्यांनी असेल.. कुणाचं देवळ्यातल्या सनईने असेल. ही नाती काव्यमय. आमचं अगदी गद्द नात पण म्हणून त्या नात्याची जवळीक कमी नव्हती. दाराची कडी वाजायची. आवाज यायचा "बाई दो ध" मग ते दुध भांड्यात ओतल्याचा आवाज. त्या आवाजाबरोबर झोपेचा निरोप घेतला जाई. मग स्टोव्हने सूर धरलेला असायचा. सकाळीच वाटर डिपारमेण मध्ये ड्युटीवर जाणाऱ्या बापू नाबराच्या चपलेची चटक फटक चटक फटक. एक तारखेच्या दिवशी मोटी चटक फटक करीत कामावर जाणारी ती पावलं महिनाखेरीस फसाक फसाक करीत घासत जायची. साऱ्या महिन्याच्या ओढगस्तीचा इतिहास त्या चपलांचा आवाज सांगत असे. तेवढ्यात वर्तमानपत्रवाल्या पोराची ललकारी. इकडे कुठेतरी मोरीत पाण्याच्या बादलीत नळाने धरलेल्या अभिषेकाचा सूर, त्या काळात नळाच्या नरड्यांना इतकी कोरड पडलेली नव्हती. 'बुडभुडभुडभुड फा~~श'... गोंद्याच्या बाबाचं स्नान सुरू. 'खिस खिस खिस फचपूरू'.... अंगाला साबण लावताहेत. 'शू~~ हुश्श फू~~ फ्फ्फ'... म्हणजे पंचाने अंग चोळायला सुरूवात. अणि 'क्ल ~ स्क~~' म्हणजे "निऱ्या काढलेलं धोतर घेउन उभ्या रहा~". "ईट ज्याडारे क " ही आरोळी आली की सकाळचे आठ वाजले म्हणून घड्याळ लावून घ्यावे. एका भल्या मोठ्या टोपलीत काळं आणि पांढरंशुभ्र मीठ विकणारे. हे जाडाबारीक मीठवाले हल्ली काय विकतात कोण जाणे. "ईट ज्याडारे क" ह्या आणि असल्या आवाजांचा अर्थ कळायला मात्र कान तयार लागतात.

गाण्यातल्या दर्दी लोकांना जसं गवयानं पहिलं 'ट्यॅ ह्यॅ' केलं की भीमपलास की भूप किंवा जो कोणता राग असेल तो कळतो त्याचप्रमाणे आवाजाच्या दुनियेतील आरोळ्यांचं आणि नाना तरहेच्या ध्वनीचं होतं. ते ध्वनी नव्हतेच. ती संपृर्ण ध्वनिचित्रंच होती. "येत्रिउरो~स." म्हणजे छत्री दुरुस्त हे कळायला जाणकारीच हवी. "लायचियल्हिहो" ही कल्हय वाल्याच्या आगमनावी नांदी होती. "आयरे प्पो ओ ~स" म्हणजे पायरी हापूस होता. हे सगळे ध्वनीचित्रकार गेले कुठे.. हापुसवाले आणि कल्हई वाले दिसतात. पण मग ते आपण आलो आहोत असं सांगणारी ती ललकारी का देत नाहीत. "पायरेप्पोहोस" ची आरोळी प्रथम कानी यायची ती एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात. परीक्षा तोंडावर आलेल्या असायच्या. चोवीस एप्रिलला जे काही बरे वाईट निकाल लागायचे ते लागले की चाळी ओस. मंडळी पोरांना घेउन आपापल्या गावाला पळायची. कोकणवाल्य़ांना बोटीचा भोंगा केव्हा ऎकीन असं व्हायचं. घाटावरची माणसं अगिनगाडीछी शिट्टी झाली की डोळ्यापुढे आपापल्या गावाकडं वळणारी वाट आणीत गाडीच्या गर्दीत बसायची आणि परवाच मी पाहिलं.. आगगाडीच्या शिट्टीचासुद्धा आवाज बदलला. हल्ली ती पूर्वीसारखी 'कू~ क' करत नाही. 'भ्या.~' असा बिभस्त आवाज काढते. विस एक म्हशी एकदम हंबरल्यासारखी संबरते आणि "नेते रे चांडाळानो तुम्हाला ओढीत" असं म्हणते. 'भ्यां' चा अर्थ तो आहे. 'कू~~क' म्हणजे "अरे चला चला.. मज्जा येइल आता" असा होता.

आगगाडीत तर आवाजाच्या कसल्या एकेक तरहा. बोटीत फक्त इंजीनची धडधड आणि अधुन मधून पूर्वी ट्रामची घंटा असे तसली टण टण टण टण अशी खोल कुठे तरी वाजणारी घंटा. आगगाडी एक तर ठेक्यात जाते. लेझमीत जशी आधी संथपणाने तांग टुक ताकड तुं तुं तांग तुक्क ताकड तुम अशी धीमी लय सुरु होते तसंच इंजिनाचाही. इंजिन.. तबलजी जसा आधी उगीचच डग्याचे ढूं~म करुन तबल्यावर थाप मारतो तसा 'फा~~स.. फ्फू~~स" असा वाफेचा भलाथोरला निश्वास टाकतं. मग चाकापासून ते कूठे कुठे लोंबणाऱ्या साखळ्या.. पंखे .. हापटणारी दारं ह्या सगल्य़ा वाद्दांसकट लेझमीसारखा तो संथ ठेका सुरू होतो. आणि हळू हळू वाढत्या लयीचा गमतीचा रंग भरायला लागतो. मला वाटतं अनेक तबलजींना आगगाडीच्या ठेक्यांतून तुकडे सुचले असतील. आगगाडीसारखा तालिया नाही. गाडीच्या खिडकीशी बसावं आणि आवाज लावावा. हव्या त्या तालाचं गाणं गाव.. मस्त साथ चालू असते. लांबच्या पल्ल्यांना लय वाढल्यावर तर बघायलाच नको. पण आपण स्वत: न गातादेखील आगगाडीत खास स्वतःची मैफल चाललेली असते. विशेअषत: फर्स्ट क्लासच्या वरच्या बर्थवर झोपावं पंख्याने सुर धरलेले असतात. त्यातून अक्षरक्ष: सतारीसारख्या गती चाललेल्या असतात. बरं हा फर्मायशी प्रोग्राम असतो हे पुष्कळांना ठाउक नसावं. पण खानदानी गाण्याची आपण पंख्याला फर्माइश करावी.." बेटा चलो भूपही सुनेंगे .." मनाशी भूप घोळवावा की पंख्यातून चक्क भूप सुरु होतो.'ज्यांना भूप येतो त्यानी आपल्या जोखमीवर गाउन पहावा'. डब्याखालची चाकं लगेच ठेका पकडतात. अर्थात पंख्याची एक सवय आहे. सांगणाराला गाण्याची जाणकारी आणि चिजाबीजांची याददास्त चांगली असली तरच ही मैफल ऎकायला मिळते. मात्र खर्‍या खानदानी कलावंताप्रमाणी मी पंख्याची मैफल ड्युटी बजावत असतो. त्याचा सुर लागत नाही. गाडीत पंख्याच्या मैफली मी खूप ऎकल्या आहे. आणि मैफैलींचे इंटर्वलही.सुरेख पडायचे. स्टेशन आलं की एकदम अनेक आवाजांची नुसती कारंजी उडायची. "च्याय ये रे म" "पानी डिग्रेट व्यॅ च्ये ~स" पासून ते "रम दो ~ध" पर्यंत वेदांचे जसे ठाराविक उच्चार आहेत तसे फेरीवाल्यांचेही आहेत. उद्या कोणी "च्यायेरेम" ऎवजी "गरम चहा~" असं स्वच्छ म्हणाला तर त्याला काढून टाकतील. खानदानी गाण्याला हे असले आवाज काढण्याचं शास्त्र जरा अधिक जवळ आहे. इथे बोलताना अडवणूक करणाऱ्या व्यंजनांना मुळी स्थानच नाही. आवाजची फेक म्हणजे नुसत्या स्वरांची फेक. तिथे "चहा गरम" किंवा "पान विडी सिग्रेट माचीस हे एवढं म्हणून आवाज फेकलाच जात नाही. हि दुनिया आवाजाची आहे. इथे अर्थ आहे तो आवाजाला. "च्यायरेम" म्हटलं की एकदम चहाच्या भरलेल्या किटलीतून 'चुळळळळ' असा आवाज होत कप भरत आला हे दृष्य डोळ्यापुढे आलं पाहिजे.