लिहीन नंतर

Started by madhura, October 27, 2015, 01:38:59 AM

Previous topic - Next topic

madhura


बेचैनीने मनात माझ्या केल्याने घर
गझल वाटते अता नकोशी, लिहीन नंतर

ठेच लागुनी जिथे भावना बधीर झाल्या
मूक लेखणी झाल्याचे येते प्रत्त्यंतर

नसेल जर का कुणी आपुले, व्यक्त व्हावया
प्रतिबिंबाशी आरशातल्या बोल निरंतर

भिन्न केवढी मुल्यमापनाची परिमाणे !
कोणी म्हणते सभ्य मला तर कुणी बिलंदर

प्राक्तनात जे, झेलावे ते ठरवुन सुध्दा !
बाण जिव्हारी जरा लागता होते घरघर

मोरपंखही टोचतात, त्या श्रीमंतांना
झोपडीतल्या स्वर्गसुखाची जाण ना खबर

एकच मोठे दु:ख भोगतो, तू गेल्याचे
छोट्या मोठ्या दु:खांचे मी सोडले पदर

वेदनेतही समोर येता नवीन वाटा
सरून गेले जगण्या मरण्यामधले अंतर

भग्न चेहरा ! अवघड आहे कयास करणे
कधी तरी "निशिकांत" असावा मस्त कलंदर


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com