आज फोडायची दहीहंडी

Started by madhura, October 27, 2015, 01:47:01 AM

Previous topic - Next topic

madhura


जमवुनी सारे गोपगडी, चला पिटवू दवंडी |
आज फोडायची दहीहंडी, आज फोडायची दहीहंडी || ध्रु ||

घरी दह्या लोण्याचे रांजण, दारी लाह्या पोह्याचे आंदण,
धन धान्याची ही उतरंडी, आज फोडायची दहीहंडी || १ ||

फळा-फुलांनी सजली हंडी, बाळ गोपाळ उभे उदंडी,
प्रेमभावाची ही कुरवंडी, आज फोडायची दहीहंडी || २ ||

उंच उंच रचू या मनोरे, काय कठीण ? जाऊ सामोरे,
ना उडायची घाबरगुंडी, आज फोडायची दहीहंडी || ३ ||

पुन्हा पुन्हा मनोरा कोसळे, गोपमेळा भूमीवरी लोळे,
नका हसू, उगाच लवंडी, आज फोडायची दहीहंडी || ४||

हंडी फोडायचा एकच चंग, चिंब पावसात भिजले अंग,
आज सोसायची थोडी थंडी, आज फोडायची दहीहंडी || ५ ||

दहीहंडी मध्ये साठवण, कष्ट करायची शिकवण,
फळ श्रमाचे मिळे त्रिखंडी, आज फोडायची दहीहंडी || ६ ||

कान्हा क्षणात रिंगणी आला, हंडी फोडुनी केला हो काला,
मुखी प्रसादाची जाई उंडी, गोविंदानीच फोडली हंडी || ७ ||

गीतकार - उपेंद्र चिंचोरे