देऊ कुणा मत मी?

Started by धनंजय आवाळे, November 01, 2015, 02:39:38 PM

Previous topic - Next topic

धनंजय आवाळे

कोण पक्ष येईल कामी?
देऊ कुणा मत मी?

भगवा, हिरवा, निळा, पिवळा
रंग घेतले तुम्ही वाटून
रंगपंचमी तुमची झाली
स्वप्न आमचे गेले फाटून

घेऊ कुणाची हमी?
देऊ कुणा मत मी?

नेहमीचेच ते तुमचे भाषण
रस्ते, पाणी आणि रेशन
एकमेका देऊन दुषण
मिळूनी करता आमचे शोषण

ओंजळ अजून रिकामी
देऊ कुणा मत मी?

कधी युती तर कधी आघाडी
जोडा जोडी अन् फोडा फोडी
सत्तेसाठी जन्म आपला
निवडून देते जनता वेडी

सगळेच येथे हरामी
देऊ कुणा मत मी?

स्वातंत्र्यासाठी गेले लढूनी
घरदार आणि संसार मोडूनी
याद त्यांची ना उरली आता
हार पुतळ्यांवर गेले सडूनी

भ्रष्टांस मिळे सलामी
देऊ कुणा मत मी?

देऊ कुणा मत मी?



. . . . धनंजय . . . .