नातं तुझ माझं

Started by शिवाजी सांगळे, November 13, 2015, 07:34:18 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

नातं तुझ माझं

मऊशार नातं दुलईशी 
गुलाबी हव्याश्या थंडीचं,
रात्र सारून येणा-या
पहाट नाजूक दवाचं!

आवडतं नातं नेहमी
फुलांच मला गंधाशी,
विहरणा-या वा-याचं
फुलपाखरू पंखाशी!

निळया आभाळाशी
नातं पाण्याच जसं,
कोणत्याहीे रंगात होते
एकरूप पाणी तसं!

केशवाच्या बासरीचं
डोईवरच्या मोरपिसाचं,
हरी प्रेमात हरवलेल्या
प्रेम तपस्वीनी मीरेचं!

नातं तुझ न् माझं
गर्भारलेल्या नभाचं,
धो धो बरसणा-या
नितळ त्या पाण्याचं!

अंधार सोबती जसं
तेवणा-या मंद दिव्याचं,
नातं शांततेत भारणा-या
सुरेल अशा भैरवीचं!

गडद अंधार रात्रीशी
तालबद्ध नातं लाटांच,
चंद्र शितल प्रकाशी
चमकत्या तारकांच!

नातं असावं अलवार
सुगंधीत चंदनी गंधाचं,
मोगरी मंद दरवळात
नातं ओलेत्या केसांचं!

नातं मधुर वचनांती
दिल्या घेतल्या सहवासाचं,
व्हाव एकरूप नातं
दिर्घ श्वास, निश्वासांच!

नात्याला माझ्या तुझ्या
चौकटीत का बांधायचं?
म्हणतो समाज सारा
म्हणुन नाव ते द्यायचं?

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९