विश्वासघात

Started by santoshi.world, December 16, 2009, 12:26:28 PM

Previous topic - Next topic

santoshi.world

हाताला चिकटलेलं रक्त पाहून मला दरदरून घाम सुटत होता. छब्या असं काही करेल याची मला स्वप्नातही कल्पना नव्हती. सैरभैर मी काळॊखाच्या कभिन्न सावलीत मुख्य रस्त्यावर येऊन घरचा मार्ग पकडला. तिकडे आईला जाऊन मी सगळं सांगणार होतो. पण एक अनामिक बल मला थोपवू पाहत होतं. "परत जा. मागे फिर. छब्याला गाठायलाच हवं!" माझं मन जड झालं होतं. मी स्थित्यंभू झालो
होतो...

.... "मित्र! मित्र नाही शत्रू आहेस तू." हेच माझे काही मिनिटांपूर्वीचे शेवटचे शब्द. किरणचे हातातले प्रेत टाकून मी पळू पाहत होतो. छब्या
माझ्याकडे पाहून प्रसन्न हसत होता. "मन्या! हे बघ. त्याचे बोट. ही बघ शर्वरीची अंगठी. हवी होती नं आपल्याला."... "तुला, तुला हवी होती ती. तरी मी सांगत होतो आपण आज पार्टीत जायला नकोच होतं!", माझे शब्द पूर्ण न करू देत छब्या त्याच्याच अवसानात रमलेला होता, "शर्वरीची अंगठी कुणाच्याच बोटात जाऊ देणार नाही मी. तिच्यावर फक्त माझा हक्क आहे. मी... केवळ मीच!", अन छब्या ती किरणच्या बोटातून खेचू लागला, "छ्या! किरणनं साल्यानं स्वतःच्या मापाची फिट़्ट बसवून घेतलीय. काढू कशी?" छब्या काही क्षण विचारात गुंतला अन मग त्याचे डोळे चमकले. मला शिसारी आली, "अरे छब्या! अरे काय करतोस हे? एक तर त्याला मारून टाकलंस अन आता त्याचं बोट कापतोयस. अरे कशाला हवी ती अंगठी आपल्याला. हे बघ पोलिसांकडे चल. ते सांभाळून घेतील. "

"हो! श्युर! पोलिसांकडे जायलच हवं." छब्या अचानक समजूतदारपणे बोलू लागला, "मी असं करतो की पोलिसांना तुझं नाव सांगतो. हा चाकू तुझ्या घरचा. हा मोबाईल! किरणचा! ज्यावर तू किरणला फोन केलास. हा बघ, हाच ना! तुझा नंबर! किरणच्या मोबाईलवर शेवटी आलेला, बघूया बरे... ", छब्याने मोबाईलची कळ दाबली अन शांततेला चिरत सारी वनराई माझ्या मोबाईलने चाळवली गेली.

मी हडबडलो अन मोबाईल खिश्यातून काढून फेकून दिला. छब्याचा मला राग आला होता पण छब्या माझा जिवलग मित्र. "छब्या अरे काय हा वेडेपणा! सोड तो मोबाईल! इथून तरी चल! पोलिसांकडे नाही पण घरी तरी!", मी त्याला पुन्हा गमावू इच्छित नव्हतो. आज खूप दिवसांनी तो मला भेटला. माझा बालपणीपासूनचा मित्र. एकमेव मित्र. माझा जीवच तो. ह्या वादळात मी त्याला एकटा सोडू कसा! माझं मन मानत नव्हतं. छब्याशी क्षणिक फारकत घेऊन मी निघालो होतो खरा, त्याला एकटं मागे टाकून पण मला माझाच राग येऊ लागला होता. मुख्य रस्त्यावर पोहोचेस्तोवर माझं मन नस्त्या शंका कुशंकानी चोंदलं होतं. किरणच्या मर्त्यभूमीवर परत जाण्याची अनेच्छा असूनही माझे पाय परत वनराईत वळले. मला छब्याला गाठायचंच होतं.

खूनाची जागा तशी दूर होती. चंद्रप्रकाशात अंधूक चंदेरी पण बरेच काळवंडलेले नागमोडी रस्ते संपायचे नाव घेत नव्हते. आजूबाजूला रातकिड्यांची किर्रकिर्र माझ्या कानांशी कुजबुजू लागली. अचानक टाळ्यांचे आवाज येऊ लागले. ह्या टाळ्या होत्या आजच्या पार्टीतल्या. संध्याकाळचा साखरपुडा. किरण अन शर्वरीचा. छब्या, मी अन इतर शंभर लोकांच्या हजेरीत किरण-शर्वरीनी अंगठ्या बदलल्या. सगळे खूश होते. मी अन छब्या सोडून. आजच
परदेशातून आलेला छब्या. अन आजच्या आनंददाई दिवशी अस्सा नियतीचा अघोरी खेळ. काहीच वर्षांपूर्वी छब्या कामानिमित्त परदेशी निघून गेला. एवढी वर्ष कुणाशी फोनवर बोलला नाही. पत्र पाठवली नाहीत. पण आज त्याचा फोन आला. मुंबईला आलोय म्हणून. आता इतकी वर्ष त्याची वाट पाहल्यावर शर्वरीलाही दोष देणेही बरे नव्हते. तिनं मग कंटाळून किरणचा हात धरला. छब्याचे कॉलेजपासूनच शर्वरीवर प्रेम होते. पण त्याने आणि मी तिला कधी त्याबद्दल सांगितले नाही. तसे तिच्या डोळ्यातले भाव छब्याला पाहताच बदलायचे. ते पाहून मला पूर्ण विश्वास वाटत होता की ती नक्की त्याची वाट पाहील. जाण्यापूर्वी मी छब्याला तसं सांगितलेलंही होतं. माझ्या विश्वासावरच तर छब्या प्रसन्न मनाने परदेशी उडाला.

पण तो विश्वास फोल ठरला. शर्वरी किरणची झाली. छब्या रडरड रडला. मीही मग त्याच्या सोबतीस मन हलकं करून घेतलं. घरी परतल्यावर सुजलेले डोळे पाहून आईने पृच्छा केली नसती तर नवलंच. पण नेहेमीप्रमाणे मी आईला त्याबद्दल सगळं सांगितलं. आई पण थोडी चिंताक्रांत वाटत होती. पोरक्या छब्याविषयी तिची चिंता मलाही सल लावून गेली. शेवटी जे व्हायचं नको होतं तेच झालं. आज रात्री आई झोपली असताना छब्या गुपचूप घरी येऊन मला शपथेवर काही न सांगता इथे घेऊन आला आणि बघतो तर काय किरण आधीच हजर! त्याच्या अन माझ्या समोरच,
छब्यानं लपवलेला चाकू काढला.... अन त्यानंतरची किरणची किंकाळी .... अजूनही माझ्या कानी घुमतेय!

काहीतरी चंद्रप्रकाशात तळपलं अन माझे डोळे उजळले. तोच चाकू. समोर पडलेला. मी उचलला आणि थोडकं पुढ्यात पाहिलं. भीतीचा मुरडा माझ्या पोटी धसला. तिकडे किरणचं प्रेत नव्हतंच. मी आजूबाजूस पाहिलं. सगळीकडेच रक्ताचे डाग पडलेले होते. छब्याने प्रेताची विल्हेवाट लावायला प्रेत कुठे नेलं हे कळायचा मार्गच नव्हता. प्रेताची विल्हेवाट लावली तर सुटण्याचा मार्ग आणखी दुष्कर होईल हे मी जाणलं होतं. आता छब्याला गाठणे अधिकच गरजेचे झाले होते. मी न रहावून "छब्या छब्या!" अशा हाका मारू लागलो. चौथ्या पाचव्या हाकेचा प्रतिध्वनी आला तोच माझ्या मागे पालापाचोळा तुटल्याचा मला आवाज झाला. मी चमकलो. लायटर पेटवला अन विजेच्या गतीने मागे वळलो. समोरच प्लॅक्सोच्या झुडुपाची गच्च पानं एक सुरात हलत होती. मी बळ एकवटून झुडुप दून सारलं अन तोच समोरून कुणीतरी माझ्या अंगावर धावून गेलं. माझ्या हाताला लायटर पडला अन विझला. मी त्याला रोखण्याचा पुष्कळ प्रयत्न केला पण तो हात माझा चेहेरा सोडतच नव्हता. मी संपूर्ण ताकदीनिशी त्याला दूर सारलं आणि जीवाच्या आकांताने पळू लागलो. पण त्याने मला गाठलेच अन मागून त्याचा बळकट हात माझ्या गळ्यात अडकवला. त्याच्या ढोपराच्या अडकित्त्यात सापडलेल्या माझ्या मानेतून माझा श्वास छातीतच अडकला. माझं हृदय बंद पडू लागलं होतं. डोळ्यांच्या रेषा आक्रसू लागल्या. तोच समोर एक छबी अवतीर्ण झाली. अस्पष्ट आवाज ऎकू आला.

"मन्या! मला सोडून जातोयंस?"
"छब्या!", हा छब्याचा आवाज होता. श्वास अडकलेला असूनही मला हायसं वाटलं. मी मदतीसाठी हात त्याच्याकडे टाकले, "हेल्प मी! प्लीज!"
"व्हाय शुड आय!", त्यानं थंड आवाजात म्हटले, "तुला श्वास घ्यायला जमत नाहीये. तू मरणार हे निश्चित. त्यात तुझे डोळे लाल झालेत. घामही येणं बंद झालंय! बस थोडा वेळ! काही क्षणातच तुझा पार्थिव सृष्टीशी संपर्क तुटेल. तू उंच आकाशी भरारी घेशील. तिथून आईला पाहशील, शर्वरीला पाहशील. दोघी रडत असतील तुझ्या नावाने. पण मी मात्र हसत असेन. तुझ्याकडे ऊंच पाहत. आता शर्वरी आणि आई, दोघींचा वाटेकरी मीच. मीच दोघींचा आसरा!", त्याचे ओठ रुंदावले अन क्रूर हास्य त्याच्या चेहेऱ्याच्या स्नायूंत पसरलं. माझ्या तोंडून शब्द फुटत नव्हते. मी त्या बळकट हाताला हिसडे देऊ लागलो. त्या हातांत जबरदस्त ताकद होती. "हेल्प! हेल्प!", मी जसा ओरडू लागलो, तसा तो फास अधिकच घट़्ट झाला. माझ्या डोळ्यांसमोर अंधारी दाटू लागली. छब्याच्या गालावर पडलेली खळी आता अस्पष्ट होत होती. तो हसत होता. त्याचं हास्य माझ्या कानांत घुमू लागलं.

"छब्याने तुझा विश्वासघात केला", ते हास्य कुजबुजू लागलं, "मित्र म्हणून ज्याच्यावर तू जीव ओतलास तोच तुझा कली झाला!"
"का! मी त्याचं काय बिघडवलं?", मी स्वतःस केलेला हा शेवटचा प्रश्न! ते विचारण्याधीच माझं अंतिम स्पंदन माझ्या छातीत विरून गेलं. मला
मारणाऱ्याचा चेहेराही मी पाहू शकलो नाही.

माझा "का?" शेवटपर्यंत अनुत्तरीतच राहिला होता.....

दुसऱ्या दिवशी स्थानिक पेपरात छापून अलेली ही बातमी
------------------------------------------
विश्वासघात... कुणी कुणाचा!

दि. १५ डिसेंबर, २००६

मित्राने मित्राचा विश्वासघात केल्याचा घटना त्रिकालाबाधित असतात, ह्याचे उदाहरण काल संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात घडलेल्या एका खूनाने दिसून
येते. शर्वरी मांडके आणि किरण सरपोतदार यांचा कालच साखरपुडा होता. रात्रीच्या जेवणानंतर किरणला त्याचा मित्र मनिष वर्देकरकडून त्याच्या
मोबाईलवर फोन आला. मनिषनं त्याला नॅशनल पार्क यथे एका निर्गम ठिकाणी बोलावले होते. कदाचित तिथं त्यांच्यात बाचाबाची झाली असावी ज्याची परिणीती एका हत्याकांडात झाली. सकाळी दहा वाजता येथे जॉगिंगसाठी येणाऱ्या लोकांना मनिष आणि किरणचे मृतदेह सापडले. पोलिसांनी ते ताब्यात घेतले असून पोस्टमॉटमला पाठवले आहे. तरी पोलिसी सूत्रांनुसार प्रथम मनिषने किरणला चाकू भोकसला असावा पण शर्थीच्या जोरावर किरणनं त्याचा गळा पकडून दाबून त्यास ठार मारले असेल. पण त्यानंतर किरणचा मृत्यु अतिरक्तस्त्रावाने झाला असावा. "छब्या" ह्या नावाचे एक गूढ ह्या प्रसंगात लपलेले असून, रात्री पार्कच्या वॉचमनने इथे "छब्या" नावाची हाक चार पाचदा ऎकल्याचे कळते. अजून एक दोन दिवसांच्या शोधकार्यात इतर धागेदोरे अन हा छब्या सापडेल असे पोलिसांनी आश्वासन दिले आहे. मनिषच्या पश्चात त्याची विधवा आई श्रीम. कुसुम वर्देकर आहेत.
-------------------------------------------

दि. २० डिसेंबर २००६.
स्थळ: बोरिवली (पू.) पोलिस ठाणे
केस. क्र.: २००१०
माहिती: मनिष वर्देकर आणि किरण सरपोतदार मर्डर केस
कार्यस्थिती: अशिल मनिषच्या आई श्रीम. कुसुम वर्देकर आणि मैत्रीण शर्वरी मांडके यांच्या लिखित साक्षीने ही केस बंद करण्यात येत आहे.
साक्ष:

शर्वरी मांडके यांच्या म्हणण्यानुसार तिचे किरणवर कॉलेजपासून प्रेम होते. मनिष दोघांचा कॉलेजातला जिवलग मित्र. तसा एरवी एकटा राहायचा. त्याला कित्येक वेळा त्यांनी त्यांच्या ग्रुप मध्ये सामील करायचा प्रयत्न केला होता. पण तो म्हणायचा, "मी छब्या बरोबर जाईन, छब्याबरोबर राहिन". त्यांना वाटायचे त्याचा दुसऱ्या वर्गातला कुणी क्लासमेट असेल. एरवी छब्याविषयी मनिष भरपूर बोलायचा. शर्वरीला हा छब्या कोण ह्याचे अतिशय कुतुहल वाटत होते. शेवटी कॉलेज सोडून १४ डिसेंबरला, तब्बल तीन वर्षांनी शर्वरीने त्याला तिच्या अन किरणच्या साखरपुड्याला बोलावायचे म्हणून तिने मनिषला फोन केला. मनिषने, "छब्यालाही आणू का?" असं विचारले. तिने होकार दिला. पण नंतर साखरपुड्याला दोघे आले नाहीत. कदाचित गर्दीत दिसले नसावेत. त्यांच्या नावाचा रोजबुके मात्र मिळाला. मग संध्याकाळी किरणला मनिषकडून फोन आला. तिच किरणला शर्वरीने पाहिल्याची शेवटची वेळ.

मनिषच्या आई कुसुम वर्देकर ह्यांच्या साक्षीनुसार मनिषचा जिवलग मित्र छब्या ह्याचे किरणची प्रेयसी शर्वरीवर प्रेम होते. म्हणूनच मनिष अन
छब्याने किरणला त्याच्या साखरपुड्याच्या दिवशी रात्री अज्ञात स्थळी बोलावले अन चाकू भोसकून त्याची हत्त्या केली. शेवटचा प्रयास म्हणून
किरणने मनिषला एकवटवून गाठले व त्यातच गळा दाबून त्याचा मृत्यू झाला. ज्याची भीती होती तेच झाले. मनिषच्या आयुष्यातला हा भास अखेर त्याच्या खुनाने संपला. मध्यंतरी कितीतरी उपाय करून मनिष छब्याला विसरला होता. पण मनाचे खेळ कुठे संपतात. छब्याला पोलिस कधीच अटक करू शकत नाहीत. कारण मनिषबरोबर छब्याचाही खून झाला आहे!

छब्या मनिषच्याच मनाचे विकृत रूप होते.....

.... मनिष स्किज़ोफ्रेनिक होता.....

- समाप्त

- विनित संखे



jyoti salunkhe