स्वप्न तुटावे म्हणून

Started by विक्रांत, January 08, 2016, 09:31:54 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

उभा होतो एकटाच
भोवती मोकळे रान
कुणासाठी कश्यासाठी
काहीही कळल्यावीण

देहाच्या साऱ्या जाणीवा
घट्ट बोथट होवून
गेले होते का न कळे 
मन भयाने भरून 

हाक देण्यास आवाज
येत नव्हता आतून
शिवलेले ओठ कुणी
प्राण बधीर होवून

मरण नव्हते तिथे
नव्हते पण जीवन
पेटलेला दाह होता
काही जळल्यावाचून

पळायचे होते पण
आकार दिशेवाचून
थांबयालाही कुठले 
कारण नये कळून

स्वप्न असावे बहुदा
लांबले नको असून
मी लाचार भयभीत
स्वप्न तुटावे म्हणून

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/