खेळ आता आटोप रे

Started by विक्रांत, January 10, 2016, 11:08:41 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

देसी नको ते ते देवा
तुझे प्रेम का न देसी
देह भोगी मोकलसी
तुझी लबाडी ही कैसी

बसविसी उंचावरी
काय ती रे मात्तबरी
तुझ्या पदावीन मज
दुनियाही व्यर्थ सारी

भोगतो रे भोगतो मी
भार सारा वाहतो मी
शम दम तितिक्षेत
तुझा तुला मागतो मी

शांत झाल्या वासना रे
पिकल्यात कामना रे
कल्प द्रुमा तुझ्याविना
अन्य नाही याचना रे

माझे मला दे रे सारे
तुझे तुला घे रे सारे
बघ झाली संध्याकाळ
खेळ आता आटोप रे

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/