अस्वस्थ

Started by shardul, January 30, 2016, 01:31:23 PM

Previous topic - Next topic

shardul


अस्वस्थपणे मोजला जाणारा प्रत्येक श्वास
विचित्र आठवणी गुरफटून येणारा प्रत्येक भास.
कोरीवपणे बेतून आणलेलं सगळं अवसान
नकोनकोसं वाटणारं प्रत्येक हिशेबी प्रमाण,
या सगळ्या गणितात 'मी' कुठेच बसत नाही.
एकला एकने गुणलं की माझं उत्तर 'शून्य' असतं, पण बाकी 'दहा' उरते.
हातचा राखलेला नसतोच कधी, मग बेरजेत शिल्लक काहीच नसते!
समांतर रेषांचे गुंतलेले त्रिकोण, चौकोन, काटकोन नकोनकोसे, हरवलेली उत्तरं, प्रश्नही चुकीचेच;
'तुझा तू, माझी मी' मध्ये गडद होत चाललेले काही संदर्भ पुसट फिकटसे..
माझ्या चित्रात रंगांचे फटकारे आकाशापार,
तुझी सारीच नुसती 'संकल्पचित्र', भूमितीत बांधलेली.
नागमोडी रेषही आज्ञाधारक बावरलेली!
इतकंच कळून घ्यायचं होतंस मला 'बदल' म्हणताना,
गोजिरवाणा देव तुझा, पाय त्याचे मातीचेच!
नाळ माझी मातीशीच,
धाव आहे इतकीशीच.
आवेगाला ओढ असते
आवेगाच्या भेटीचीच..!!


By My fav actress Spruha Shirish Joshi