डॉ.पोतनीस (श्रद्धांजली )

Started by विक्रांत, February 02, 2016, 07:10:52 PM

Previous topic - Next topic

विक्रांत



तुरळक राखलेली दाढी
नेहमीच असे हनुवटीवर
केस काळे कुरळे नीट
आणि चष्मा नाकावर

पेहराव सदैव टी शर्ट
घट्ट झालेला पोटावर
एक मोठी गाडी वेगळी
साहेब यायचे ड्युटीवर

माणूस मोठा दिलदार
बोलायला खूप मोकळा
कधी खोचक पण तिरका 
शब्द येई ठेवणीतला

धाडकन उचलून ठेवायची
सवय होती मुलखाची
ड्युटीवरच्या स्टाफची
छाती उगा धडधडायाची

फालतू बोलता कधी कुणी
ऐकून मुळी घ्यायचे नाही
उपचारात पण कधीही 
कुचराई ती व्हायची नाही

दोन वाजता रात्री डबा
हमखास असे मासे मटण
व्हेज माहित असूनही मी
आदराने असे आमंत्रण

न पटणाऱ्या गोष्टीवर
सदा तोंडसुख घेणारच
डॉक्टरकीचा सार्थ अभिमान
घरात इंग्लिश बोलणारच

दरवर्षी कॅम्प हमखास
कुठे कुठे ते ठरलेले
सांभाळून साऱ्या नेणार 
माणूस धन हे जोडलेले

कॅन्सरचे होता निदान
स्थिर घट्ट होते मन
ऑपरेशन किमो मधून
गेले सहज हसून खेळून

जिंकत आले होते खरेतर
पण रोग परते उलटून
उद्याचे मरण कधी पण
ठेवले ना आज आणून

आणि सरले युद्ध जेव्हा
हार ठाकली समोर येवून
सारे सुहृद गाठून भेटून
गेले तयाचा निरोप घेवून

चाकरमानी असून जगणे
चाकोरीत कधीच नव्हते
खूप वेगळे दिसते उमटून
आयुष्य असे क्वचित असते

विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in