तू येशील तेव्हा ये रे

Started by विक्रांत, February 02, 2016, 07:16:26 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

तू येशील तेव्हा ये रे 
माझे मागणे नसे रे   
तुज वाटले कधी तर 
उधळून माझे दे रे     

हा वर्षाव वेदनांचा 
मजला नवीन नाही 
किती जन्म वाहुनी हे
ओझे असे अजूनही

असोत हिशोब तुझे   
जे मजला न कळती
अन देता मिळे काय
प्रश्न कधी न पडती

जवळी भाव सुमने
मज ठाव फक्त देणे 
कळतो ना नफातोटा
व्यापार काही करणे

सर्वस्व माझे हे देणे
जणू फुल ओघळणे
लक्ष्य तारका नभात 
गळून एक पडणे

जाईन जन्म हा वाया   
जावो उगाच सरून
तृण फुल कधी का रे
आकाश घेते व्यापून

तव प्रांगणात आले 
तव चांदण्यात न्हाले
तव वर्षा ऋतू प्याले
जणू मीही तूच झाले

द्वैताची आस अशी ही
अद्वैतास का पडावी 
आकाश होवूनही का
धरातृषा जळास व्हावी   

तू जाणतोस अवघे
का खेळ असा खेळसी
मोहात पुनरपि का
जन्मास मज घालसी

विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in