वृक्ष

Started by janki.das, February 17, 2016, 11:20:40 AM

Previous topic - Next topic

janki.das


"वृक्ष"
आज एक वृक्ष कोसळताना पाहिला,
मूकपणे अलगद पाचोळ्यात सामावला.
चतुर हातांनी डाव धूर्त साधला,
सरपणासाठी क्षणात बळी घेतला.
कुणी म्हणे, अंगणाची बिघडवे शोभा,
पडला तर काय? वाटे धोका.
कुणी म्हणे, अंगणी पाचोळा खूप,
किरणांची भरारी पानांतच गुडूप.
विसरले सारे रूप डवरलेले,
सावलीत लपलेली घरट्यातील पिल्ले.
विसरले सारे अंगाखांद्यावरचे खेळ,
पिढ्यांची राखण अन् नात्यांचा मेळ.
येणार ही घडी.. ठाऊक होते त्याला,
सोबत्यांपाठी उरला होता एकला.
संमुख तव अंत आज आला,
पळभरात पाठी भुगा मात्र उरला.
घरी दारी, रानी वनी सर्वत्र असाच संहार,
अवनीच्या शालूत ठिगळांचा सुमार.
उजाड भूमीवर दुष्काळ मागे उरला,
आज एक वृक्ष कोसळताना पाहिला.
© रचना : प्रसन्ना शानभाग