लोक असे का दुरून गेले ?

Started by dhanaji, February 22, 2016, 11:50:42 AM

Previous topic - Next topic

dhanaji



लोक असे का दुरून गेले ?


घडावयाला नको, नेमके घडून गेले
हवेहवेसे लोक असे का दुरून गेले ?


दबा धरोनी शिकार केली, तेच गारदी
प्रेतावरती गळा काढुनी रडून गेले


वशिला नसता बढतीची का आस धरावी ?
लुळे पांगळे शिड्या भराभर चढून गेले


कैक मालिका टीव्हीवरच्या जन्मसोबती
असे न होते कधी कथानक सरून गेले


असून अडचण नसून चणचण, सखे असे का ?
आपसातले प्रेमरंग का उडून गेले ?


नेत्यांच्या वारसांस मिळते उमेदवारी
बाप आमुचा कारकून हे नडून गेले


मृत्यूच्या मार्गावर डॉक्टर जागोजागी
इलाज थोडा टोल वसूली करून गेले


नवपर्णांना वाव द्यावया फुटण्यासाठी
पान जुनेरे खुशीखुशीने गळून गेले


"निशिकांता"च्या घरी राबता अंधाराचा
सखी भेटता मनी चांदणे भरून गेले


निशिकांत देशपांडे.