हरवलेली चाळिशी!

Started by gaurig, December 21, 2009, 12:57:37 PM

Previous topic - Next topic

gaurig

हरवलेली चाळिशी!
रविवार, २२ नोव्हेंबर २००९
गौतम ननावरे========================================
पती-अगं, माझा चष्मा कुठाय?
पत्नी-असेल तिथेच. घ्या शोधून. मी स्वैपाक करतेय ना?
पती-तिथेच म्हणजे कुठे?
पत्नी-तिथेच म्हणजे तुम्ही ठेवला होतात तिथेच.
पती-इथेच तर टीपॉयवर ठेवला होता.
पत्नी-मग असेल तिथेच.
पती-अगं, मुळात नेहमीच्या जागी टीपॉयच दिसत नाही.
पत्नी-असं का? म्हणजे नशीब तेवढं तरी दिसलं म्हणायचं. तिकडे बेडरूममध्ये उचलून ठेवलाय तिथे बघा.
(तो बेडरूममध्ये न जाता किचनमध्ये येतो. ती पीठ मळत असते.)
पत्नी-अहो, मी तुम्हाला बेडरूममध्ये टीपॉय असल्याचं सांगितलं. हे किचन आहे, बेडरूम नव्हे. अरे देवा, किचन आणि बेडरूममधला फरकही आता कळेनासा झाला वाटतं.
पती-अगं, किचन काय बेडरूम काय..
पत्नी-तुम्हाला काय सारखंच.
पती-ये पण, तुझ्या गालाला पीठ लागलंय. काय छान दिसतेस हा तू.
पत्नी-दिसणारच छान. मग आता काय आय लव यू म्हणताय? चावटपणा करू नका. तुम्हाला मी सांगितलं की हे बेडरूम नाही किचन आहे आणि काय हो, गालाला लागलेलं पीठ बर बिगरचष्म्याचं दिसलं? जा जा तिकडे, मला स्वैपाक करू द्या.
पती-जातो जातो बेडरूममध्ये. तू येतेयस का?
पत्नी-कशाला?
पती-अगं चष्मा..
पत्नी-घ्या शोधून
(तो किचनमधून बेडरूममध्ये जातो)
पती-अगं ऐकलंस का?
पत्नी-हो ऐकतेय. मी काय बहिरी नाही.
पती-अगं, टीपॉय सापडला, पण त्यावर चष्मा मात्र नाही.
पत्नी-मग आता मी काय करू? स्वैपाक करू की नको?
पती-अगं, पण माझा चष्मा कुठाय?
पत्नी-तुम्ही कुठे ठेवला होतात तिथे बघा. मी टीपॉय उचलला तेव्हा त्यावर तुमचा चष्मा नव्हता.
पती-अगं, मग मगाशीच नाही का सांगायचंस. टीपॉय शोधून झाल्यावर आता सांगतेयस.
पत्नी-सांगितलं असतं, पण तुमचा माझ्या सांगण्यावर विश्वास बसला नसता ना?
पती-अगं, ते ठीक आहे, पण माझा चष्मा कुठाय?
पत्नी-असेल तिथेच. स्वत:ची एक वस्तू जागेवर ठेवायची नाही आणि मग शोधत बसायचं. आधी तुम्ही स्वत:चे खिसे तपासा.
पती-खिसे तपासू म्हणतेयस. बरं तपासतो, तपासतो हं! अगं, ऐकलंस का?
पत्नी-इतकी वर्षे झाली तुमचं ऐकायला माझ्याशिवाय या घरात कोणी आहे का?
पती-नाही.
पत्नी-म्हणूनच आईकतेय मी तुमचं सारं.
पती-कुठे आईकतेस. मघासपासून विचारतोय चष्मा कुठाय. चष्मा कुठाय. तर..
पत्नी-सांगितलं ना, खिशात बघा म्हणून.
पती-बरं बरं बघतो हा. अगं, ऐकलंस का? खिसे बघायला सांगितलेस, पण पँट कुठाय?
पत्नी-तुमची पँट कुठे ठेवता तिथे बघा.
पती-तिथेच तर बघितली. इथेच तर अडकवली होती. तिथे ती दिसत नाही.
पत्नी-नशीब तेवढं तरी दिसलं. कुठल्या रंगाची पँट होती?
पती-कुठल्या बरं रंगाची होती? हां, बरोबर, आठवलं आठवलं, निळ्या रंगाची होती.
पत्नी-कुठल्या निळ्या रंगाची?
पती-कुठल्या म्हणजे काय? अगं, निळ्या रंगाची निळी.
पत्नी-अहो, त्यात लाईट आहे, डार्क आहे, आकाशी आहे, रेघावाली आहे. तुम्ही कुठली घातली होती?
पती-तूना कोणत्याही गोष्टीत फार गोंधळ घालतेस.
पत्नी-मी. मी. गोंधळ घालतेय? का तुम्ही घालताय? आपण कुठली पँट घातली होती हेही ज्या माणसाला आठवत नाही त्या माणसाबरोबर इतकी वर्षे संसार केला. देवा रे, कुठल्या जन्माचे हे भोग आहेत तूच जाणे रे.
पती-ए गप! मी काय विचारतोय चष्मा कुठाय?
पत्नी-अहो, असं काय करताय, निळी पँट तुम्ही घातली होती ना?
पती-हो घातली होती.
पत्नी-मग तिच्याच खिशात असेल.
पती-तू शोधून देऊ शकत नाही?
पत्नी-मी चपात्या लाटतेय.
पती-आयला, मगाशी पीठ मळत होतीस आता चपात्या लाटतेस.
पत्नी-अहो, पीठ मळल्यावर चपात्याच लाटणार ना?
पती-असं काही नाही काय. अनेक वेळा तू पीठ मळतेस आणि ते फ्रिजमध्ये ठेवून मला फक्त भात खायला घालतेस.
पत्नी-अहो, ते पीठ दुसऱ्या दिवसासाठी मळलेलं असतं.
पती- तुझी उद्याची कामं तू आज करतेस आणि माझं आताचं काम करीत नाहीस. माझा चष्मा कुठाय तो दे शोधून.
पत्नी- कुठे शोधताय?
पती- दारामागे, निळ्या पॅन्टीच्या खिशात, पण पॅन्ट जागेवर नाही.
पत्नी- कुठल्या दारामागे बघताय?
पती- हॉलच्या दारामागे.
पत्नी- अहो, तिकडे कुठे शोधताय?
पती- मग कुठे शोधू?
पत्नी- किती वेंधळेपणा हा..
पती- असू दे, पण चष्मा कुठाय तो अगोदर सांग.
पत्नी- अहो, तुम्ही पॅन्ट काढून आज बेडरूमच्या दारामागे अडकवली आहे ना?
पती- असं का. मग मगाशीच हे सांगायला काय झालं होतं. बरं बरं बघतो हां? ए अगं, ऐकलंस का?
पत्नी- बोला ऐकतेय.
पती- पॅन्ट सापडली.
पत्नी- मग आता काय खिसा सापडत नाही.
पती- सापडला गं, पण खिशात चष्मा नाही.
पत्नी- मग आता मी काय करू? तुम्ही कुठे ठेवलात तिथून घ्या शोधून..
पती- तुझ्या चपात्या करून झाल्यात ना, आता जरा चष्मा शोधून देशील का?
पत्नी- मी काय करतेय दिसतंय ना?
पती- हो.
पत्नी- काय करतेय?
पती- भाजी चिरतेयस.
पत्नी- नुसते पीठ मळले, चपात्या केल्या म्हणजे स्वयंपाक होत नाही. त्याबरोबर डाळ लागते, भात लागतो, तो शिजायला लावलाय आणि भाजी लागते ना ती चिरतेय..
पती- तू थोडासा वेळ काढून माझा चष्मा शोधून देतेस का?
पत्नी- मी काम करतेय आणि तुम्ही रिकामे आहात. तेव्हा तुम्ही तो शोधून का घेत नाही?
पती- तुझा प्रश्न बरोबर आहे. त्यावर माझे उत्तर असे आहे की, मी शोधून घेतला असता, पण मला तो सापडत नाही.
पत्नी- चष्मा कोणाचा?
पती- माझा.
पत्नी- तो सांभाळण्याची जबाबदारी कोणाची?
पती- माझी.
पत्नी- आपल्या वस्तू आपण सांभाळायला नको का?
पती- सांभाळायला पाहिजेत.
पत्नी- मग तो हरवतो कसा?
पती- अगं तो हरवलाय कुठे?
पत्नी- हरवला नाही, मग मगासपासून काय शोधताय?
पती- अगं, होता माझ्याकडे, असेल इकडेच कुठे तरी, पण आठवत नाही.
पत्नी- तुम्ही ठेवलात आणि तुम्हाला जर आठवत नाही तर मग मला कसा सापडेल?
पती- अरे बापरे! किती बोलतेस, किती बोलतेस, मला आता वेड लागायची पाळी आलीय. माझा चष्मा कुठाय?
पत्नी- तुम्ही अंगात घातलेल्या शर्टाच्या खिशात!