सोहंच्या स्फोटापर्यंत ...

Started by विक्रांत, March 06, 2016, 11:07:45 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

 
खोल खोल गेलो आत
मनाच्या तळापर्यंत
शब्दांचा सोडून हात
जाणीवेचा वेध घेत

उफाळतांना विकार
शांतपणे न्याहाळत
जाता स्वप्न उधाणत
दिसण्याचे साक्षी होत

खोल खोल खूप आत
जीवनाच्या स्पर्शापर्यंत
श्वासाचे संगीत ऐकत
सळसळ रक्त पाहत

शांत शांत खूप शांत
श्वासही थांबेपर्यंत
अस्तित्वाचे टरफल
बीजाचे रुजणे होत 

पानोपानी लहरत
मुळाच्या टोकापर्यंत
भिजला कण मातीचा
प्राजक्त गंध झेलीत

उंच उंच वर वर
आकाशाच्या पोकळीत
आदी अंत ओलांडीत
शून्याच्या निरवतेत

पाण्याच्या वाफेगत
पाहणे विरघळत
कोहंच्या उगमातून
सोहंच्या स्फोटापर्यंत


विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in