ती

Started by abhishek panchal, March 09, 2016, 07:11:38 AM

Previous topic - Next topic

abhishek panchal

राजमाता जिजाऊ , राणी लक्ष्मीबाई , बहिणाबाई , सावित्रीबाई ते कल्पना चावला , इंदिरा गांधी , सिंधुताई , मदर तेरेसा आणि अशा बऱ्याच . नावं घेण्यातच संपूर्ण लेख संपून जाईल . पण या स्त्रिया . अशा असामान्य स्त्रिया . ज्यांनी स्वतःचे एक असे वेगळे स्थान निर्माण केले . पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियाही काही करू शकतात , याचं उत्तम उदाहरण त्या बनल्या . राजकारण , समाजकारण , व्यवसाय , क्रीडा , मनोरंजन , कोणतेही क्षेत्र घ्या . आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया आपले स्थान राखून आहेत . तेही स्वकर्तुत्वावर , स्वहिमतीवर आणि स्पर्धा करून . कित्येकदा पुरुषार्थ काय असतो , हे स्त्रियांनीच दाखवून दिले . अशा स्त्रियांचा आदर ठेवण्यासाठी एखादा दिवस राखून ठेवावा लागतो , हि खेदाची गोष्ट . पण तरीही त्यांचा , त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी मात्र हा उत्तम दिवस . हा एक दिवसाचा आदर नेहमीच दिसायला हवा .

          एकीकडे स्त्री पुरुष समानतेचे नारे देणारे आपण आणि दुसरीकडे स्त्री म्हणून हिनवणारेही आपणच . जरा मागे इतिहासात डोकावले , तर राजमाता जिजाऊ डोळ्यासमोर दिसतील . कोण होत्या त्या ? छत्रपती शिवाजी महाराजांच्या आऊसाहेब . स्पष्ट बोलायचं तर , राजमाता जिजाऊंचे शिवाजी महाराज पुत्र होते . स्वराज्याचे बाळकडू राजांनी त्यांच्याकडूनच घेतले . यवनांनी दिलेल्या त्रासाला प्रत्युत्तर त्यांनीच दिले . नीट विचार करावा . आपणही कदाचित यवन तर नाहीना होत आहोत . जर त्या स्त्री मधली जिजाऊ जागी झाली , तर आपला संहार निश्चित . यवनांना अद्दल घडवणारी स्त्रीच , इंग्रजांना धडा शिकवणारी स्त्रीच , समाजासाठी खपणारी स्त्रीच , देशाचं नाव सातासमुद्रापार नेणारी स्त्रीच आणि कर्तृत्व असूनदेखील मागे पडणारी देखील स्त्रीच .
                आपल्याप्रमाणेच मनुष्य जन्म धारण करूनदेखील अनेक भूमिका एक स्त्री लीलया बजावते . मुलगी बनून जन्म घेते आणि घरात लक्ष्मीला घेऊन येते . बहीण बनून भावाचा आधार बनते , सुख दुःखातली साथी बनते . बायको होऊन नवी सुरुवात करते . त्याग आणि नव्याचा स्वीकार याचं उत्तम उदाहरण बनते . कुणा एकाचं अर्ध आयुष्य बनून जाते . आई होऊन जगातलं सर्वोच्चं स्थान मिळवते . माया , काळजी , प्रेम , जिव्हाळा आणि अशा बऱ्याच भावनांची व्याख्या समजावते . प्रत्येक भूमिकेला न्याय देतच ती जगत असते . मग अशा स्त्री चा आदर ठेवण्यासाठी एक दिवस राखून का ठेवावा लागतो ? कुठेतरी आपण कमी पडतोय . नाहीतर असा भेदभाव कधी जन्मालाच आला नसता किंवा इतके वर्ष जगलाही नसता . पण आता बदल घडवायला हवा . बदल घडवायचा ठेका आपणच उचलायला हवा . छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानतो आपण , आता त्यांचे आदर्श विचार आचरणात आणायला हवेत . स्त्री समाजाची गरज आहे , एक अविभाज्य घटक आहे . स्त्री लक्ष्मी आहे , स्त्री जिजाऊ आहे . स्त्री देवी आहे , स्त्री आई आहे . अशा या विशाल व्यक्तिमत्वाला माझे नमन .

माझ्या एका कवितेतील काही ओळी इथे टाकतो .

माणूस आहोत आपण
जनावर नाही
होत नाहीत परिणाम
यांच्या मनावर काही

विचार तरी कसे येतात ,
यांच्या मनातून
अत्याचार करतात तिच्यावर ,
जन्म घेतात जिच्या उदारातून

ती  काळाची गरज आहे
परक्याचं धन नाही
अत्याचार करणार्ऱ्यांना
माणसाचं मन नाही

आनंदाच्या जगात यांनी
अत्याचाराचं पिक पेरलं
माणूसकीचं रक्त
माणसात नाही उरलं