Navin Kavya

Started by Anandkand, March 15, 2016, 12:03:32 PM

Previous topic - Next topic

Anandkand

झिरपत गेलेली कविता घेऊन

झिरपत गेलेली कविता घेऊन
मी चालतो माझीच वाट
ओली-कोरडी, वेडी वाकडी

तिची सुरुवात एका क्षणांत होते
आणि अंत होत नाही
चेहऱ्यावर सुरकुत्या येतात, डोळे खोल जातात..
पण आत ती नवजातच असते

तिच्या चिरंतनत्वाचा ध्यास
माझ्या लेखणीतून झरतो.
कागदावर ती स्वतःचं अस्तित्वच
जणू कोरत जाते.....कायमचं

कुंचल्यांचे फटकारे जसे
ध्रुवासारखे स्थिरावतात
शिल्पातले आकार जसे
अचलासारखे उभरतात
तिचीही धडपड तशीच असते

तप्त कोरड्या जमिनीवर
ती बरसून झिरपू पाहते
स्वतःला रुजवू पाहते
कधी तिचा वृक्ष होतो
कधी मृदगंध होऊन उडून जाते

तिच्या अस्तित्वाला मात्र कधीच बाधा येत नाही
वृक्ष झाली तर सावली देते
मृदगंध सरळ स्मृतीत जाऊन बसतो..

अशा चिरंतन काव्याची
मी वाट चालू लागतो
इतका दूर आलोय आता
की ही माझीच वाट म्हणतो

-आनंदकंद