नाती

Started by abhishek panchal, March 16, 2016, 11:21:59 PM

Previous topic - Next topic

abhishek panchal

जोपासलेली नाती , अशीच असतात
थोडी कडु , थोडी गोड
कधी काळजी , कधी खोड
कधी भांडण , कधी मजा
थोडी बेरीज , थोडं वजा
नेमकं तेव्हाच , सारी गणितं फसतात
जोपासलेली नाती , अशीच असतात

आनंदात झऱ्यासारखी बरसतात
आणि तुटल्यावर , भेटीसाठी तरसतात
सारं प्रमाणात असावं , तेव्हा नाही कळत
नेमकं अशाच कवितेत , शब्द नाही जुळत
कळत नाही तेव्हा , शब्द कसे रुसतात
जोपासलेली नाती , अशीच असतात

विचार - मतांवरून , भांडण तंटे होतील
दिवस गेले तश्या , रातीही जातील
धीर ठेवा थोडा , अन चित्त ठेवा जागी
कोडं सोपं आहे , उगाच बनू नका योगी
विचारांचे जासूस , उगाच कंबर कसतात
जोपासलेली नाती , अशीच असतात

संशयाची कीड , पोखरू लागते मती
तोडा-फोडी करण्यात , हिची मोठी ख्याती
हीच एक कारण , ज्याने कडूपणा येतो
फळांचा तो राजा , कचऱ्यात विलीन होतो
एकामुळे सारेच , उगाचच नासतात
जोपासलेली नाती , अशीच असतात

                                          - अभिषेक पांचाळ
                                           ( ९०२८८७५९५८ )