उन्हाळ्याची सूट्टी

Started by designer_sheetal, March 29, 2016, 05:37:35 PM

Previous topic - Next topic

designer_sheetal

एप्रिल महिना सुरु झाला कि चाहूल लागते ती वार्षिक परीक्षेची आणि त्यानंतर येणारी ती जादुई उन्हाळ्याची सूट्टी! आता त्या सुट्ट्यांची जागा सीक लीव्ह, पेड लीव्ह, Annual लीव्ह ने जरी घेतली असली तरी त्याला शाळेच्या उन्हाळ्याच्या सुट्टीची सर नाही. ते दिवसच काही और होते.

प्रत्येकाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीच्या व्याख्या वेगळ्या होत्या. कोणासाठी सुट्टी म्हणजे मामाच्या गावाला जाणं, कोणासाठी मनसोक्त खेळणं, कोणासाठी नाचाचे/गाण्याचे क्लासेस करणं तर कोणासाठी नाटक/सिनेमे पाहणं. माझ्यासाठीं सुट्टी म्हणजें फक्त आणि फक्त गोष्टीची पुस्तकं! कधी एकदाची परीक्षा संपतेय आणि मी माझं पुस्तकांचं गाठोडं सोडतेय असं मला व्हायचं. नवीन पुस्तकं तर घ्यायचीच त्याच बरोबर जुनी पुस्तकं परत वाचून काढायची हेच माझे सुट्टीतले उद्योग. बाल-साहित्यातलं एकही पुस्तक मी शिल्लक ठेवलं नसेल. चिंगी, गोट्या, श्यामची आई, अकबर बिरबल, सिंदबादच्या सात सफरी, अलिबाबा चाळीस चोर, अल्लाउद्दिन आणि जादूचा दिवा, इसापनीती, पंचतंत्र, गुलबकावली, ग्रीमच्या परीकथा, चांदोबा, चंपक, ठकठक, विक्रम वेताळ, अरेबिअन नाईट्स, सिंहासन बत्तीशी, हितोपदेश, अलिफ लैला, हातिमताई एक न अनेक...  हि तर केवळ लक्षात असलेली नावं, लक्षात न राहिलेलीही असंख्य होती. चिंगी आणि गोट्याचा खोडकरपणा तर श्यामचा निरागसपणा, अकबर आणि बिरबलची मिश्किल जुगलबंदी, अल्लाउद्दिनच्या दिव्यातून प्रकट होणारा जीन, अलिबाबाची जादुई गूहा प्रत्तेक पुस्तक डोळ्यासमोर एक नवीन विश्व निर्माण करायचं. याच पुस्तकांनी मला imagine करायला शिकवलं म्हणूनच कदाचित मी आज creative field मध्ये आहे.

हल्लीच्या मुलांमध्ये वाचनाची आवड फारच कमी दिसून येते. दिवसभर शाळा, क्लास करून आधीच त्यांच्याकडे वेळ नसतो आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत सो कॉल्ड समर कॅम्प्स. आमच्या वेळी शाळा एके शाळा, दर इयत्तेला कुठला क्लास करायची कधी गरज नाही वाटली आणि फावल्या वेळेत आवडीचे छंद जसे ओरिगामी, वाचन त्यामुळे समर कॅम्प्स ची कधी गरज नाही वाटली. २/३ दिवसांपूर्वी एक जाहिरात वाचनात आली लहान मुलांसाठी मॉडेलिंग क्लास कम कॉम्पिटिशन. त्यात मुलांना  छान छान कपडे घालून Ramp वर कसं चालायचं, पर्सन्यालिटी डेव्हलपमेंट, जाहिराती साठी फोटो शूट वगैरे. जिंकणाऱ्या मुलांना फिल्म स्टार्स सोबत ramp walk ची संधी....  आणि हो त्या क्लास ची भरमसाठ Fees जी Non-refundable! पैसे काढायचे उद्योग सारे.  या लोकांनी बर्यापैकी ओळखलंय कि आजकाल च्या बिझी आईवडिलांना आपल्या मुलांसाठी अजीबात वेळ नसतो मग ते वाटेल तितका पैसा मोजून असल्या समर कॅम्प्स मध्ये पैसे गुंतवतात ...आपलं मूल BOLD होण्यासाठी. (हीच designer कपडे घालणारी मेक ओव्हर केलेली मुलं पुन्हा शाळेत जाताना चापून चोपून तेल लावून कशी जात असतील देव जाणे)

दुसरं कारण म्हणजे मोबाइल. मी अनेक वेळा malls मध्ये पाहिलंय आया shopping करत असतात आणि मुलं एका ठिकाणी बसून मोबाईल वर गेम्स खेळत असतात(याच आया मुलं मोबाईलच्या आहारी गेली म्हणून गळा काढत असतात).  मोबाईल मूळे अख्खं जग मुलांच्या हातात आलंय. खेळ त्याच्यात, अभ्यास त्याच्यात, गाणी-सिनेमे त्यात आणि मित्र मैत्रिणीही त्यातच. मग कशाला जातील मुलं storybooks च्या वाटेला. वाचन माणसाला विचार करायला शिकवतं. पोटाला जसं जेवण तसं डोक्याला वाचन. वाचन डोक्याला विचार करायला खाद्य पुरवतं. लहानपणी वाचलेली पुस्तकं जितकी लक्षात रहातात तितकी मोठेपणीची नाहीत. म्हणूनच आजही आपल्याला भोपळ्यात बसलेली म्हातारी लक्षात आहे, अलिबाबाचं खूल जा सीम सीम, आणि बिरबलाची खिचडी!


शीतल
http://designersheetal.blogspot.in