प्रेमाचा अर्थ

Started by niteshk, April 20, 2016, 11:46:21 PM

Previous topic - Next topic

niteshk

प्रेम नाही धगधगते निखारे
आतल्याआत धूमसून विझवायचं नसतं
प्रेम म्हणजे कृष्णाची वेणू
मधुर स्वरांमधे स्वत्व हरवायचं असतं

प्रेम नसते रोरावतं वादळ
सगळं संपवून सोडायचं नसतं
प्रेम असते वाऱ्याची झुळूक
मंद मंद सुखद् वहायचं असतं

प्रेम नसते पायातली बेडी
जोखड बनून अडवायचं नसतं
प्रेम असतं नाजुक फुलपाखरू
कोषाचे बंध झुगारून उडायचं असतं

प्रेम म्हणजे नाही प्रखर सूर्य
दाहकतेने होरपळून जायचं नसतं
प्रेम म्हणजे डवरलेलं वटवृक्ष
ऊन झेलून सावली देत रहायचं असतं

प्रेम काही ज्वालामुखी नाही
एका उद्रेकाने संपवायचं नसतं
प्रेम म्हणजे सुगंधी चाफा
संपूनही धुंद दरवळायचं असतं

स्वलिखित