सैराट झालं जी...!

Started by Rajesh khakre, May 13, 2016, 10:56:15 AM

Previous topic - Next topic

Rajesh khakre

महाराष्ट्रभर गाजत~ बिजत आहे की नाही हे अजिबात माहीत नसलेली (कवी) राजेश खाकरे यांची सैराट वरील ही सैराट कविता

"सैराट झालं जी"

सैराट म्हणजे
प्रेम या कोमल भावनेचा हळूच उदय होणं
दिवसरात्र प्रेमासाठी 'झिंगाट' होऊन जाणं

सैराट म्हणजे प्रेमाचं "याड" लागणं
प्रेमाच्या मधुर भावनेत गुंगून जाणं

सैराट म्हणजे बेधड़क प्रेम करणं
प्रेम मिळवण्यासाठी जगाशी लढणं

जगाचे नियम झुगारुन आपल्या रस्त्याने चालणं
पदोपदी ठोकरा खात रक्तबंबाळ होणं

सैराट म्हणजे मैत्रीची अमूल्य साथ
दिवा जळत राहावा म्हणून झालेली वात

सैराट म्हणजे कुटुंबाची वाताहत होणं
प्रेमाची सजा जणू सर्वानीच भोगणं

दुनियेच्या नजरेआड घरटें आपलं थाटणं
जीवनाशी लढ़ताना अनेक तडजोड़ी करणं

सैराट म्हणजे चटके बसल्यावर भानावर येणं
आपणच उचललेलं पाऊल पुन्हा चाचपुन पाहणं

सैराट म्हणजे वास्तवाचा संसार आणि संसारातला संशय
नाहक येणारा गैरसमज अन नात्याचा कंप

सैराट म्हणजे प्रेमालाही उतरती कळा लागणं
अन जपलेली प्रेमाची जागा तिरस्काराने घेणं

सैराट म्हणजे दुरावा अन दुराव्यातला ओलावा
मात्र खरं प्रेम आटत नाही त्याचा ही पुरावा

सैराट म्हणजे अनामिक जिद्द प्रेम टिकवण्याची
सैराट म्हणजे पाय घट्ट् मातीत रोवण्याची

सैराट म्हणजे संघर्ष जगण्यातला
माणसातल्या नात्याचा अन नात्यातल्या जातीचा

सैराट म्हणजे संघर्ष लहान मोठ्या मनाचा
मानलेल्या जपलेल्या खऱ्या-खोट्या प्रतिष्ठेचा

सैराट म्हणजे प्रेमासाठी सर्व उधळून देणं
 सैराट म्हणजे प्रेमासाठी एकरुप होणं

सैराट म्हणजे सुड मनात रुतलेला
प्रतिष्ठाच्या आवरणात घट्ट गुंडाळलेला

सैराट म्हणजे रक्ताळलेली पावलं जनमनावर उमटलेली
सुन्न झालेली सैराट मने थार्यावर आलेली

सैराट नाही प्रेमाचे अपयश ते तर अपयश मानसिकतेचे
प्रेमाला कुठलाय जात पंथ ते तर अपयश सामाजिकतेचे

सैराट प्रेम, सैराट गोडवा, सैराट जगणं,सैराट मरणं

असं मरणं की मरणाने ही हळहळावं क्षणभर
प्रेमाचं महत्व त्यालाही कळावं मणभर

मरणाने ही व्हावे बेभान जणू अन उसळून त्याने ही म्हणावं
"सैराट झालो जी"
©राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com

(कविता forward करायची इच्छा झाल्यास कविच्या नावासाहित forward करावी)