या हृदयीचे त्या हृदयी

Started by Siddhesh Baji, December 25, 2009, 08:36:14 PM

Previous topic - Next topic

Siddhesh Baji

 लेखक, कवीची अभिव्यक्ती शब्दांत उतरते ती स्वत:साठी की रसिकांसाठी हा कदाचित वादाचा विषय असू शकतो; पण हे शब्द आणि त्या शब्दांच्या पलीकडलेही रसिकांप
र्यंत प्रभावीपणे पोहचवण्यासाठी गेल्या २० वर्षांमध्ये 'शब्दवेध' चळवळीने दिलेले योगदान मात्र वादातीत आहे. ज्येष्ठ गायक, अभिनेते चंदकांत काळे यांनी माधुरी पुरंदरे, संगीतकार आनंद मोडक अशा सशक्त सहकाऱ्यांच्या साथीने रंगमंचावर आलेल्या सात ते आठ कार्यक्रमांनी जवळपास ४००च्या आसपास प्रयोग केले आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातील रसिकांना एक वेगळी अनुभूती दिली. २१व्या वर्षानिमित्त आज या सर्व कार्यक्रमांच्या एमपी थ्रीचे दोन संच प्रकाशित होत आहेत, रसिकांच्याच हस्ते. त्यानिमित्ताने आज आणि उद्या प्रीतरंग आणि साजणवेळा हे कार्यक्रमही एस. एम. जोशी सभागृहात सादर होणार आहेत.

'शब्दवेध'ची सुरुवात झाली ती १९८८ साली. संत परंपरेतील अभंग रसिकांसमोर मांडणारा अमृतगाथा हा कार्यक्रम काळे यांनी रंगमंचावर आणला. तोपर्यंत अभंग गायनाची एक पठडी तयार झालेली होती. ती चाकोरी सोडून लोकसंगीताच्या अंगाने जाणारे १४ अभंग शब्दवेधने निवडले, तेही असे की ज्यांचा अर्थ आजही तितक्याच सार्मथ्याने रसिकांच्या मनाला भिडावा. वेगळे अभंग, वेगळे संगीत आणि निवेदनाची वेगळी धाटणी असूनही या कार्यक्रमाला रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला. अगदी विदर्भ, खानदेश, कोकणातील दुर्गम खेड्यांमध्येही त्याचे प्रयोग झाले आणि त्या ग्रामीण भागातील संवेदनेलाही ते तितकेच भावले. तीच गोष्ट 'शेवंतीचे बन' या बहिणाबाईंच्या आधीच्या काळातील स्त्रियांनी लिहिलेल्या कवितांच्या कार्यक्रमाची. याची संहिता लिहिणे हाच आव्हानात्मक व आनंददायी प्रवास होता, असे काळे म्हणतात. लोकसाहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासिका सरोजिनी बाबर, शांता शेळके यांची त्या प्रवासात मदत झालीच; पण इतिहासकार राजवाडेंसारख्या व्यक्तीनेही त्या काळातील स्त्रीच्या प्रतिभेचा घेतलेला अभ्यासपूर्ण शोध त्यानिमित्ताने पाहता आला. बहिणाबाईंच्या आधी होऊन गेलेल्या, कायम अंधारातच राहिलेल्या या कवयित्रींची देदीप्यमान प्रतिभा रसिकांसमोर आली. रसिकांना फक्त सवंग करमणूक आवडते, ही समजूतही शब्दवेधच्या या कार्यक्रमांनी खोटी पाडली. 'साजणवेळा' हा कवी ग्रेसांच्या कवितांवरचा कार्यक्रमही असाच दाद मिळवून गेला. या हृदयीचे त्या हृदयी घालण्याची कला काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना साधली असल्याचेच या कार्यक्रमांनी सिद्ध केले. संत तुकारामांच्या स्वत:च्या आयुष्यावर आधारित अभंगांचा 'आख्यान तुकोबाराय' हा प्रयोग असो, स्त्री-पुरुष प्रेमसंबंधांना कवितेची गवसणी घालणारा प्रीतरंग हा कार्यक्रम असो, जाणकार रसिकांनी त्या प्रयोगांची निश्चित दखल घेतली.

शब्दवेधचा यापुढील प्रवासही वेगळी वाट चोखाळणारा असेल, यात शंका नाही. भास्कर चंदावरकरांनी संगीत दिलेल्या खानोलकरांच्या कवितांचा 'नक्षत्रांचे देणे' हा कार्यक्रम बऱ्याच वर्षांपूवीर् रंगमंचावर आला होता. चंदावरकरांनी निवडलेल्या कवितांना आजवर इतर कोणीही हात लावलेला नाही, तोच कार्यक्रम पुन्हा रसिकांसमोर आणण्यासाठी सध्या काळे यांचा प्रयत्न सुरू आहे. दुसऱ्या बाजूला कुमार गंधर्वांनी निमिर्लेल्या रागांवर, विशेषत: धुनउगम रागांवर मराठी कविता बांधण्याचा प्रयोगही ते करताहेत. करमणुकीच्या प्रांतात कितीही बदल होत असले तरी रसिकांचा एक वर्ग मात्र नक्कीच या कार्यक्रमांकडे डोळे लावून बसला असेल.

- गौरी कानेटकर