कळो यावे

Started by विक्रांत, May 13, 2016, 06:40:57 PM

Previous topic - Next topic

विक्रांत



कुणासाठी धावायचे
कश्यासाठी धावायचे
कळ छाती घेऊनिया
सारे काही सोडायचे

मोठेपण खोटे आहे
अहंकार नटलेले
यस सर जी मैडम
मनात या गुंडाळले

कधी वाटे सारे काही
सेवा असे बाकी नाही
आतल्या त्या दुर्बळाची
पर्वा पण केली नाही

कोण तुझे कोण माझे
कुणालाच नको ओझे
सोडा सारे उमजा की 
आपण गुलाम राजे

पाहू जाता कळू येते
सुख पंख जळलेले
दारावरी श्वान सदा
बंदी तुवा तू केलेले

मिटलेल्या डोळीयात
विभ्रमांनी सजलेले 
बरबट उणे जिणे
जागेपण येता कळे

देवाहाती दैत्य अस्त्र
देऊनिया झुंजवती 
सज्जनाला दुर्जनांच्या
गावामध्ये वसवती

किती अन कश्यासाठी
न कळता का लढावे
टाळ्या पिटती चाणाक्ष
तयासाठी का नाचावे

कधीतरी थांबायला
हवे जीवा सांभाळाया 
हातातून निसटत्या
आयुष्याला वेचावया


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/