चिट्ठी का नाय पाठवत ?

Started by abhishek panchal, May 19, 2016, 11:30:14 PM

Previous topic - Next topic

abhishek panchal

दूर जावून तुला , आज उमगलं ना बाळा
या बापाचा तुझ्यावर , किती व्हता जिव्हाळा

उन्ह तान्ह कसली , फिकीर नव्हती मला
दोन घास सुखाचे , द्यायचे होते परीला
पैसा अडका सारा , तुझ्याचसाठी व्हता
तू होतीस जवळ , म्हणून जीव व्हता जीता

दूर जावून तुला , ते प्रेम खूप खातंय
तुझ्याइतकच माझं , काळीज वलं होतंय

सोडून सारं इथेच , तू निघून गेलीस दूर
जुन्या अंगाईचे ते , कुठे हरवले गं सूर ?
त्याच अंगाईनं , तू झोपी जात व्हतीस
आता झोप नाही मला , अंधारल्या रातीस

उन्ह तान्ह आता , लई तरास देतंय
भरलेल्या दुःखानं , दिस सरून जातंय
तूच नाही इथे , त्यो पैसा काय कामाचा
तुझ्यासाठी असेल , नेक विचार त्या रामाचा

म्हणूनच तुला , त्यांनाच नेलं असल
हा पिरम बीम सारा , त्याचाच खेळ असल
मग माझंच पिरम आता , कुठेतरी हरलंय
बापाचं काळीज , आज खोटं ठरलंय

अब्रू किती गेली , फिकीर नाही त्याची
अशी तरी अब्रू , व्हती कुठं जीवाची
तुझ्या सुखापुढं , सारं फिकं व्हतं
पिरम झालंय मला , एकदा सांगायच व्हतं

न सांगताच कशी , तू दूर निघून गेलीस
जाते म्हणून सांगायला , जवळ नाही आलीस
वाट बघतोय मी , काही चमीत्कार व्हईल
असेन मी दारात , अन तुझी चिट्ठी येईल

म्हणत असशील तू , खूप आठवतोस तू आता
सुखी हाय मी इथं , येते ठेवायां मी माथा
तुझी चिट्ठी पाहून , आसवं रोखता नाही येणार
सुख तुझं पाहून , मी बी सुखी व्हनार

पण नाही असं झालं , मी दारातच उभा
विणवतो वरडून , आता बरसणारे नभा
सारं देऊनसुदधा जग , दात्यालाच इसरतील
आस व्हती मला , तू बदल नक्की करशील

पण आस फोल गेली , खोटा ठरलो मी
पिरमामध्ये माझ्या , झाली काही कमी
माफ कर मला , अन ये ना भेटाया
चूक झाली असेल , तर पडतो तुझ्या पाया

दूर जावून तुला , हा बाप का नाय आठवत
आठवण ठेवून त्याची , चिट्ठी का नाय पाठवत

                                     - अभिषेक पांचाळ