ओढ

Started by पल्लवी कुंभार, May 21, 2016, 12:37:41 PM

Previous topic - Next topic

पल्लवी कुंभार

दिसामागून दिस सरणे,
क्षणाक्षणात मन मोहरणे,
तुझ्या असण्याची आस लागणे,
अन आठवणींच्या हिंदोळ्यावर,
वेडे मन झुलत राहणे...

तुझ्या हळुवार स्पर्शासवे,
कुंद कळी गंधाळणे,
जणू रजनीच्या शीतल चांदण्यात,
परसात रातराणी दरवळणे...

तुझे पाहणे जसे,
श्रावणातल्या सरींनी बरसणे,
अन कवेत घेणे,
जणू आकाशाला सप्तरंगांनी गवसणे...

तुझे जाणे जसे की,
रात्रीला चंद्राची सोबत नसणे,
ही ओढ अशी की,
तुझे जाणे,माझे कण-कण तुटणे...

अखेरच्या क्षणी,
तुझा स्पर्श भावणे,
निरोपाच्या त्या क्षणात,
फक्त तुझी आस लागणे...

भेटीत तुझ्या जरी बरसे
प्राजक्त माझ्या अंगणी,
धरतीलाही गंध फुटे,
जेव्हा याट लागे आकाशी...