माझ्यासाठी एवढं करशील ना ग ?

Started by Shri_Mech, June 21, 2016, 10:32:25 AM

Previous topic - Next topic

Shri_Mech

***माझ्यासाठी एवढं करशील ना ग ?***

आपण पहिल्यांदा भेटलो तो कट्टा
फोनवर तासन् तास मारलेल्या गप्पा
आपण एकत्र तुडवलेल्या वाटा
तुला यातलं काहीच आठवत नाही का ग ?


पावसात फिरताना घालवलेला वेळ
चौपाटीवर ताव मारून खाल्लेली भेळ
घरच्यांना समजावून जमवलेला मेळ
तू हे सगळं विसरली नाहीस ना ग ?


तू जाग्या केलेल्या माझ्या जाणिवा
तुझ्यासाठी झालेला हा जीव हळवा
तुझ्यावर केलेला प्रेमाचा शिडकावा
तुला हे सगळं लक्षात आहे ना ग ?


तुझ्या काळजीने झालेली तगमग
तुझ्या भेटीसाठी केलेली धडपड
तुझ्या खुशीसाठी केलेली खटपट
तुला यातलं काहीच दिसत नाही का ग ?


त्या दिवशी मी नको तसा वागलो
तुझ्या प्रेमाला समजू ना शकलो
नंतर एकांतात ढसाढसा रडलो
पण तू मला माफ करशील ना ग ?


माझ्या एका चुकीने चेतलेला निखारा
आपल्या नात्याचा विस्कटलेला डोलारा
आपल्या भावनांचा झालेला कोंडमारा
तू कधी विसरणारच नाहीस का ग ?


माझ्या मनाच्या आर्त हाका
डोळ्यात दिसणारा अश्रूंचा साठा
चेहऱ्यावर पसरलेला रुक्ष सन्नाटा
तू कधीच पाहणार नाहीस का ग ?


तुझ्यावाचून जीव झालाय नकोसा
कधी मिळणार ग मला दिलासा
राणी, संपव ना ग ही अवदसा
मला सावरायला तू येणार ना ग?

Shri_Mech
Shri_Mech

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]