शब्दांचे दान...

Started by genius_pankaj, June 27, 2016, 08:50:26 PM

Previous topic - Next topic

genius_pankaj

आणिक काही नको देवा
शब्दांचे मज दान दे
तव निर्मित या सृष्टीचे
शब्दांकरवी अमृतपान दे...

विकारांची या करुनी होळी
शुद्ध चांदणे चमकुदे मनआभाळी
लेखणीतून उतरेल या असे
संवेदनांचे भान दे...

बनवी मज ज्ञानाचा चातक
अज्ञानावरी कोसळेन भयानक
तेजोमय शब्दबिंदुंची मज
आजन्म एक तहान दे...

शौर्याचे सागर कधी हळव्या भावनांचे आगर
कधी विराणी तर कधी आनंदाचे जागर
झंकारुनी उठतील सारेच रस
इतकी शब्दांना माझ्या जान दे...

कल्पनाकोकीळ गाई मंजुळ गायन
काव्यरसपानांती भ्रमरांचे मधुर गुंजन
पानाफुलातून वेलीतून ओसंडे चैतन्य
शब्दांचे असे चिरंतन हिरवे रान दे...

अंती थकेन मी झुकेन मी
या वाटेवर कधी चुकेनही मी
तुज्याजवळ पण येताना, चार शब्दांचा
या धरतीवर मला मान दे...


-- पंकज