चालणे टाळायचे का ?

Started by Swamiji, December 29, 2009, 11:23:17 PM

Previous topic - Next topic

Swamiji

चालणे टाळायचे का...

ऊन्ह तापे रे दुपारी, चालणे टाळायचे का,
फूल कोमेजून गेले, ते तरी माळायचे का?

धान्य कोठारात नासे, पोखरूनी कीड लागे,
हाय, पैसा वाचवाया जोंधळे चाळायचे का?

वाघबच्चा अंगणी ये, वाट त्याला सापडेना,
जीव लावाया दयेने पोसुनी पाळायचे का?

चूल पेटेना कशीही, लाकडे ओली म्हणूनी,
चंदनाचे खोड आहे कोरडे, जाळायचे का?

कोण मोठा धाकटा रे, शिक्षणाने वा पदाने,
मोल पैशाने करूनी माणसा टाळायचे का?

लौकिकाचा मोह वेडा, या जगाला जिंकण्याचा,
दैव नाही साथ द्याया, खंगुनी वाळायचे का?

देव भावाचा भुकेला, त्यास प्रेमाने भजावे,
उग्र कष्टाने तनूला वावगे पोळायचे का?

- स्वामीजी (०९ एप्रिल २००८)
(वृत्त व्योमगंगा - गालगागा गालगागा गालगागा गालगागा)

rudra