[b]आयुष्याची वजाबाकी करताना..[/b]

Started by SagiGharage, July 27, 2016, 08:00:13 PM

Previous topic - Next topic

SagiGharage

आयुष्याची वजाबाकी करताना..

लेेखन: सागर घारगे

म्हणतात, काहीतरी तथ्य मांडणेसाठी त्याविषयीचा भूत अनुभव मिळवणे गरजेचे असते.
*आयुष्याची वजाबाकी करताना..* हा शब्दांचा संच मांडताना मला काहीसं भुतकाळात आपल्याच माणसांच्या प्रेमवलयात हिंडावं लागतेय.

मला आठवते जेव्हा मी लहान होतो. सायंकाळची वेळ होती. विज गेलेली होती. त्यावेळी विज आता आहे त्यासारखी निरंतर नव्हती. मी पळत पळत घरी गेलो आतल्या खोलीत दिव्याच्या उजेडात आई रात्रीच्या जेवणासाठी काहीतरी बनवत होती. बाबा तिथेच बसले होते. मी पळत आलो आणि मला काय सुचले आणि काय म्हणालो...

"मामी ! मामी तुमच्या सागरचा एक्सिडेंट झालाय! !"

अंधारात त्यांना माझा चेहरा नीटसा दिसला नसावा. माझं वाक्य संपल्याबरोबरच आईच्या हातातील भांडं खाली निसटून जमीनीवर दोन तीन कोलांट्या खात कुठेतरी कोपर्यात जाऊन पडलं. बाबा बसल्या ठिकाणी ताडकन उभे राहीले.

आणि मी त्यांची ती दशा पाहीली. आपल्याकडून चेष्टेच्या भरात भयंकर काहीतरी चुकीचं घडल्याची जाणीव झाली.

पण काहीतरी बोलणं गरजेचं होतं.

ओरडलोच,

"मज्जा.. मज्जा..!!"

माझ्या त्या मज्जाबरोबर एक खणखणीत हात माझ्या गालावर येऊन पडला होता.. आता वातावरण गरम आणि गाल मात्र पूर्ण गार झालेला होता.

आईने देदणादण बदडायला सुरुवात केली होती.

"परत करशील काय अशी चेष्टा...? बोल करशील काय?"

असं म्हणत ती मला पाच-सहा मिनिटेतरी निरंतर बदडत होती.. मी फक्त..

"आ (डॅश)ई... चेष्टा... आ..(परत डॅश) चेष्टा करत होतो.."
इतके काही मोजके शब्द बोलले असतील.. नंतर फक्त

"बोल करशील का चेष्टा.."

आणि ढाब ढीब्ब.. आ.. नाय करत परत... आऊऽ

हा आवाजच (लयबद्ध!) घुमत होता.

या आवाजात मात्र
"अगं बास कर.. किती मारतेस?"

हे बाबांचे करुणशब्द पुसटसे जरी मला ऐकू आले तरी आईला मात्र ते ऐकू गेले नसावेत किंवा त्याकडे तिने जाणून बुजून कानाडोळा केला असावा.

त्यावेळी मी खूप लहान होतो.. पण आईचा तो मार.. आजही तितक्याच प्रकर्षाने शरीरावर जाणवतो.. अन् त्या रात्री दिसलेले काजवे तितक्याच स्पष्टपणे आजही चमकताना दिसतात...

मित्रांनो,
आपण आपल्या कुटूंबात सर्वात सुरक्षीत आणि प्रेमळ वातावणात जीवन व्यतीत करत असतो. अनेक व्यक्तींबरोबर आपला जिव्हाळा जडलेला असतो. त्यात सर्वात जास्त जिव्हाळा, प्रेम जर कुणाकडून मिळत असेल तर ते म्हणजे आपले आई-बाबा.

त्याची माया, प्रेम याची तुलना कोणत्याच व्यक्तीशी करता येणार नाही. केवळ आपल्या अपत्याच्या अपघाताच्या बातमीने त्यांचे इतके वाईट हाल होऊ शकतात तर, मग ज्या माता पित्याना काहीक कारणास्तव वृद्धाश्रमांतल्या भकास खोल्यांमध्ये आणून सोडले जाते अशांच्या अपत्यांना खरंच त्यांचे आई-बाप कळाले आहेत का असा प्रश्न नेहमी माझ्या मनात घोळत रहातो.

मी जेव्हा कधी कधी अशा वृद्धाश्रमांना भेट देत असतो तेव्हा तिथल्या आजी-आजोबांची ती दारावर खिळलेली नजर मला सारखी अस्वस्थ करत असते. आपल्या अपत्याविषयी बोलताना आतुन जाणवणारं त्यांचं ते निस्वार्थी प्रेम बघत असताना त्यांनी जन्मास घातलेल्या त्या निष्ठूर कातळ दगडांना टाकेनेे फोडून काढावेसे वाटते...

म्हणतात, मनुष्य हा जन्मापासून मृत्यूपर्यत शिकत असतो.. आपण जेव्हा बालपणात असतो..तेव्हा बाबांकडून वडीलपण शिकत असतो.. आईकडून तिचं आईपण शिकत असतो.. पुढे ही शिकवण आपण आपल्या अपत्यांना प्रदान करणार असतो..

आपलं अपत्य म्हणून ते जितकी आपली काळजी घेतात.. जसेे आपले पालकत्व स्विकारतात.. तसेच आपणही त्यांना आपले अपत्यच मानायला हवे.
कारण जन्मताना फक्त एक गोंडस बाळ जन्म घेत नाही, तर त्या बाळासोबत त्याचे आई-बाबा देखील नव्याने जन्म घेत असतात.

म्हणून मित्रांनो, आपल्या आई-बाबांना जपा, प्रेम द्या.. तुमच्या जन्मापुर्वीपासून आणि त्यांच्या मृत्यूपर्यत निर्मळ आणि निर्भेळ अंत:करणानं प्रेम करणारी ही माणसं... आयुष्याच्या वजाबाकीत वजा झाली तर जीवनात परत बेरीज करण्यासारखं काहीच उरणार नाही....

©®
*लेखन: सागर घारगे*, सांगली
मोबाईल: 9960450648
©®
*लेखन: सागर घारगे*, सांगली
मोबाईल: 9960450648