मी ही एक अश्वत्थामा. ...?

Started by Ashok_rokade24, August 15, 2016, 09:04:38 PM

Previous topic - Next topic

Ashok_rokade24

जीवन असले नश्वर तरीही ,
मी ही एक अश्वत्थामा आहे ,
भळभळत्या जखमा साथीला ,
तेल शोधीत भटकत आहे ,

अश्रू दशरथाचे हास्य कैकयीचे ,
सदैव मी पाहिले आहे ,
अवती भवती असती सारे ,
जीवन वनवासी साहीले आहे ,

मला न भेटला कधी सुदामा ,
न लाभले मज कधी पोहे ,
चक्रव्यूहात असा अडकलो ,
घास सुखाचा शोधीत आहे ,

न पाहीली दमयंती नलाची ,
न ऐकीली कधी साद ह्रदयाची ,
कर्कश आरोळी सदा आठवते ,
कर्ण बधीरता अनुभवीत आहे ,

न मजशी पुंडलिक  दिसला ,
न दिसला कधी श्रावण बाळ ,
सुखाचे असती सोबती सारे ,
परि कर्तव्य माझे करित आहे ,

सांजवेळ आयुष्याची झाली ,
हिशोब मांडून बसलो आहे ,
काहीच न ऊरले हाती आता ,
वाट सुर्यस्ताची पहात आहे ,
वाट सुर्यास्ताची पहात आहे ???

                      अशोक  मु. रोकडे .
                      मुंबई.
,