हवे कशास सरकार !

Started by Asu@16, August 27, 2016, 11:26:20 AM

Previous topic - Next topic

Asu@16

  हवे कशास सरकार !

जनहिताचे निर्णय घेती
न्यायालये वारंवार,
निर्णयक्षमता गमवून बसले
वा घेती निर्णय सुमार.
           न्यायालये निर्णय घेती
           मग हवे कशास सरकार !
आश्वासनांचा पाऊस पाडती
बिन बादल बरसात.
जनसेवेचे नाटक करती
कृतीशून्य गप्पिष्ट सरदार.
           न्यायालये निर्णय घेती
           मग हवे कशास सरकार !
निवडून येता 'सत्तापक्ष'
मिठूमिठू तोंडी, विठूविठू करणार.
घेती निर्णय निराधार
पोपटपंची सरकार
           न्यायालये निर्णय घेती
           मग हवे कशास सरकार !
निवडून दिले जनतेने
करण्या अन्याय, भ्रष्टाचार !
शेत खाते कुंपणच तर,
तक्रार कुणां करणार !
           न्यायालये निर्णय घेती
           मग हवे कशास सरकार !
जे जे अन्याय्य अन् जनबाधक
ते ते हे करणार
सत्ता संपत्तीचे साधक
जनांचे काय भले करणार !
           न्यायालये निर्णय घेती
           मग हवे कशास सरकार !
जनरक्षक की जनतक्षक हे
प्रश्न मनी पडणार.
अनधिकृत ते अधिकृत करती
आमदार आणि खासदार.
           न्यायालये निर्णय घेती
           मग हवे कशास सरकार !
वेतनधारी पेंढारी हे
तुंबड्या स्वतःच्या भरणार.
बसलो देव पाण्यात घालून
सुधारेल कधी सरकार.
           न्यायालये निर्णय घेती
           मग हवे कशास सरकार !
संस्थानिकांविना काही ना अडले
ह्यांच्या विना काय अडणार !
त्यांच्यासाठी कुणी ना रडले
ह्यांना कोण रडणार !
           न्यायालये निर्णय घेती
           मग हवे कशास सरकार !
हवा कशास निवडणूक खर्च
हवा कशास मतदानाचा फार्स.
थांबवा दुर्गंधित मच्छीबाजार
लोकशाहीची जत्रा इथे भरणार.
           न्यायालये निर्णय घेती
           मग हवे कशास सरकार !
जिवंत मरणे जनता जगती
मरणा कोण भिणार.
हाडांचेही सौदे करती
जगण्या दीन, लाचार
           न्यायालये निर्णय घेती
           मग हवे कशास सरकार !
शेजारी जेव्हा तोंड रंगविणार
'अभी मारा, अभी मारके देख'
प्रतिक्रिया आमची नेहमी एक.
आम्ही ना बदलणार.
           न्यायालये निर्णय घेती
           मग हवे कशास सरकार !

- अरुण सु. पाटील

https://www.facebook.com/AsuChyaKavita