ayushya

Started by bindu, September 22, 2016, 11:47:43 PM

Previous topic - Next topic

bindu

नसें देह मनावीण
मनां नसें जागा देहावीण
घालमेलीचा पिंगा अंतरी
देह मनाची रेटारेटी

असें गरज उभयतां
देह मनाची निरंतर
होई मन वढाळ वढाळ
असतां देह निश्चल

स्वभाव भिन्न दोहोंचा
परिं अस्तित्व द्वयें एकमेकां
घालमेली - रेटारेटित जीवना
ईहलोकी चाले व्यवहार तयांचा

उचंबळती भावना बहुविध
देह मनाच्या सांगडीतून
उद्भवती विरोध अनंत
असतां कारण स्वभाव भिन्न

ओंजारूनी मनाला
गोंजारूनी देहाला
घालीता लगाम मन-तरंगा
ठायी अंतरी निश्चलता

उपाय एक तो सांधण्या
वढाळ मन निश्चल देहा
असावें साधनामस्त अंतरंगा
साधावी अंतर्यामी एकाग्रता

साधना अविरत निरंतरी
साधे बांधणी देह मनाची
खुलविती सौंदर्य परस्परीं
परावर्तने सुंदर जीवनाची

करीता साधना प्राप्ते आत्मानंद
संयम अंतरी ऐकावा अंतर्नाद
साधावे मीलन सकल बिंदुंचे
करूनी समन्वय देह मनाचे

प्रयत्ने साधे खंबीर मन-देह
गुंफावे देह-मन उजविण्या सौंदर्य
अंतरी सुंदर श्रेयस दिसे विश्व तद्वत
व्हावे सौंदर्य परावर्तीत जनमानसांत