|| पती म्हणजेच परमेश्वर ||

Started by विक्रांत, September 24, 2016, 08:53:15 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

 
पती म्हणजेच परमेश्वर
असं नुसतं ऐकलं
तरी त्याला फार बर वाटत
कफल्लकाला पडावं स्वप्न
की
आपल्याला दत्तक घेतलय
अंबानींन
तसंच काही उरात होतं

असं म्हणतात
चाळीस पन्नास वर्षापर्यंत
असंच काही चित्र होतं
पुरुषांसाठी घर खरखुर घर होतं
तेव्हा आपल्याला जन्माला घालतांना
ब्रह्मदेवाच घड्याळ
नक्कीच बिघडलं असावं
असं खात्रीपूर्वक वाटत राहत

आपण का घाबरतो
त्याला अजूनही कळत नाही
बायकोपुढं बोलायला बळच येत नाही
आठवू लागतो तेव्हापासून
समोर येतात पराजय
केलेले तह अन
फडकावली पांढरी निशाण

बायको सोडून जावू शकते
काडीमोड घेवू शकते
कोर्टातही खेचू शकते
हे तर फारच पुढचं आहे
माहेरी जाता ती
दोन चार दिवसात
त्याची हवा खाली होते
चारी टायर फलॅट
सारे अवसान गळून जाते

फार तर एकाध रात्र
पार्टी बिर्टी होऊ शकते
उशिरापर्यंत कधीतरीच
त्याची टकळी चालू शकते
पण मग तो सकाळी
खालसा झालेला राजा होतो
नवीन करार तहाचे
निमूट मान्य करून घेतो

नाही म्हणजे परमेश्वर नसला तरी
कधी कधी पूजा होते
फक्त त्याचे डोके तेवढे
फुटायचे नारळ होते
आरतीही होते 
साऱ्या चुकांची उजळणी
अन आपल्या मूर्खपणाची
शंभर टक्के बजावणी
आई वरून स्तोत्र
अन बहिणी वरून भजनं होतात
श्रवण करून प्रेमानं
त्याच्या श्रुती धन्य होतात 
नशिबाने क्वचित
कधी मिळतो चपलाहार
नैवद्याला कैन्टीन मधला
चार दिवस आहार

व्हाटसअपवरील नाचक्की
तिला कशी कळते
हे असले गुपित अवघड
त्याला कधी नच कळते
फोनला चार लॉक लावून
झिप फाईल सील करून
तिला सारे माहित असते
अचूक विकेट घेतली जाते

देवी ती अन सारे दैवीपणही 
तिलाच आता बहाल असते
पण पती म्हणजे परमेश्वर
असलं स्वप्न 
त्याला अजूनही पडते
 

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in