विदेही प्रीत

Started by विक्रांत, September 24, 2016, 09:03:21 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

प्रवासात दूरच्या त्या
बाजूस होती माझ्या तू
स्पर्श सारे मग तुझे
आले देही माझ्या उतू ;

म्हटलो तुला रस्ता हा
नच संपवा कधीही 
हसली नुसतीच तू
नच समजुनी काही ;

थरथरत हिवाने
मजला बिलगलीस
सहज किती माझ्या
देहात वीज झालीस ;

मुक्त केस तुझे होते
भोवती गंध भारले
यौवनाचा वृक्ष देही
पान पान थरारले ;

तुला परी त्याची मुळी
जाणीव नव्हती काही
तुझी अबोध भावना
मग आली माझ्या देही ;

शुभ्र चंद्र पौर्णीमेचा
रिक्त सारे आभाळही
विसरुनी वादळास
प्रीत ही झाली विदेही  ;

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/