निनावी

Started by Jueli, October 15, 2016, 02:42:37 PM

Previous topic - Next topic

Jueli

भीती वाटते लेखणी हातात घ्यायला,
कोऱ्या कागदाने शाईच प्यायली तर?
पांढरा कागद निळा होईल,
कृष्णासारखा !
आणि झिरपेल त्यावर
माझी प्रत्येक भावना,
उघड होईल माझं मन,
आजवर दडवून ठेवलेलं फुलपाखरू.
लोकं वाचतील,
चर्चा होतील,
टीका करतील,
थोरवी गातील माझ्या लेखनाची...
पण नकोय मला हे,
मला बोलायचंय
कुठल्याही मापात न झुकता,
कोणत्याही चष्म्यातून न पाहता.

कागद निळा झाला,
उतरली प्रत्येक भावना,
जखमेला घातलेला टाका उसवला,
आणि उरलं माझं रितेपण !
तितक्यात पाऊस आला,
माझ्या आसवांचा,
कागद भिजू लागला,
शब्द धूसर झाले,
स्वल्पविराम लोपले,
आणि लुप्त झाले पूर्णविराम !
कागद पुन्हा पांढरा झाला,
जुन्या ओळींच्या नकाशासह.
माझं मन पुन्हा सुखावलं,
शाश्वत,
चिरंतन वैगरे सगळं मिथ्या असतं,
सत्य असतो केवळ तो क्षण,
रसरसलेला,
टप्पोरा भरलेला,
माझ्या कोऱ्या कागदासारखा.
लिहित असते मी त्यावर आवडेल त्या शाईने,
कधी जपून ठेवली जातात काही पानं,
तर काहींचा होतो निव्वळ चुरगळा !