अखेरच्या वळणावर ....(दोन) .....

Started by Ashok_rokade24, December 14, 2016, 08:40:50 PM

Previous topic - Next topic

Ashok_rokade24

वळणावर अखेरच्या ,
मागे वळून पहातांना ,
पूर आसवांचा वहातो ,
आठवणी आठवतांना ||

चेहरा जरा सुरकुतलेला ,
दिसती कष्टांच्या झळा ,
नाकात नथ साजरी ,
भाळी कुंकवाचा टिळा ,
झरा मायेचा वाटे ,
मुख तीचे पहातांना ||

ऊठूनी भल्या सकाळी ,
झाडलोट घरअंगणाची करी,
चुलीवर गाडगे दुधाचे ,
तव्यावर भाजते भाकरी ,
डोळ्यात साठली माया ,
घास दुधभाकरीचा भरवतांना ||

नेसून लुगडे नऊवारी ,
डोक्यावर दुपारची शिदोरी ,
कंबरेस खोचून विळा ,
वाट शेताची धरी ,
डोळ्यात चिंता दाटली ,
मागे वळून पहातांना ||

खुंटीला बांधल्या शेळ्या ,
कोंबड्यांची पिले खुराडी ,
अंगणात बसलेला राजा ,
रक्षण सर्वांचे करी ,
नजर तीच्या वाटेकडे ,
अंगणी एकला खेळतांना ||

घास मायेने भरवी ,
तृप्त मनाला  वाटे ,
रात्रीस काळोख दाटे ,
भय अती जीवास वाटे ,
चिंता न कशाची वाटे ,
कुशीत तीच्या निजतांना ||

संस्कार तीचे मनी रूजले ,
आयुष्य माझे सफल झाले ,
आशीष मज सदैव लाभले ,
आठविता शब्द मूक झाले ,
डोळे नीत माझे पाणावती ,
आजीस माझ्या आठवतांना ||

पूर आसवांचा वहातो ,
आठवणी आठवतांना ||

                  अशोक मु. रोकडे .
                   मुंबई,