कविता चोरांसाठी मार्गदर्शन..!

Started by Rajesh khakre, December 21, 2016, 12:08:09 AM

Previous topic - Next topic

Rajesh khakre



कविताचोरी चे वाढते प्रमाण बघता या क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या व नाव गमावू इच्छिणाऱ्या सर्व नवोदित उमेदवारांना मार्गदर्शन पर काही उपदेश ( जे कि आम्ही सुद्धा इकडून तिकडून ढापले आहेत हे तुम्हाला कळू न देता ) देणे हे आम्ही स्वतःच आपले कर्तव्य समजतो. 
या क्षेत्रात पाऊल ठेवण्यापूर्वी काही गोष्टी अगदीच काळजीपूर्वक ध्यानात घेणे आवश्यक आहे त्यात मुख्यतः जेव्हा तुमच्या हे लक्षात आले की अगदी मुंग्या येईपर्यंत विचार करुन हि आपल्या मूलतः जड असलेल्या डोक्यातून काव्य किंवा लेख असे ज्याला म्हणता येईल असे काहीही निघत नाही हे प्रथमदर्शनी तुमच्या ध्यानात आल्यावर या क्षेत्राकडे वळण्यास हरकत नाही.मात्र आपल्याला काही सुचत नाही ही गोष्ट आपल्या स्वतः व्यतिरिक्त इतर कुणालाही कळू देऊ नये किंवा ती गोष्ट कुणाला कळतच नाही असा स्वतःच स्वतः चा गैरसमज करुन घ्यावा. तसेच आपल्याला कविता लेख साहित्य याची खूपच आवड आहे हे ही वरचेवर दाखवावे, आणि त्यासाठी आपण ते ज्ञान कुठूनही मिळवण्याची तयारी ठेवतो अशी प्रतिमा तयार करुन ठेवावी (ह्याचा फायदा पुढे कुठून ही कविता किंवा लेख चोरतानाही होतो)
कविताचोर या क्षेत्रात खूप मागणी (आपल्या भाषेत चोरी) असली तरी उत्तम साहित्यचोर बनण्यासाठी काही युक्त्या आम्ही चोरुन आणलेल्या साहीत्यात वाचावयास मिळालेल्या आहेत, त्या गुपचूप आपणापुढे सांगत आहे, त्यात सर्वात महत्वाचे टेक्निक म्हणजे copy-पेस्ट हे होय, कॉपी केल्यावर पेस्ट करण्यापूर्वी निर्लज्जपणे मुळकवीचे किंवा लेखकाचे नाव खोडून त्या ठिकाणी आपले नाव घालण्यास अजिबात विसरु नये. आणि हे करताना लाज किंवा शरम अजिबात बाळगू नये. सुरवातीला असे करताना थोडी भीती किंवा लाज वाटेल त्यामुळे हळूहळू आपल्या मनाला असंवेदनशील बनवत न्यावे जेणेकरून आपण हे पुण्याचे काम बिनदिक्कत करु शकू.
आपण चोरलेल्या कविता आपल्या प्रेयसी इत्यादींना पाठवून काही दिवस प्रेमाचा पाऊस ही पाडून बघावा, आपणास फारशा ओळखत नसलेल्या मित्रांना अधूनमधून पाठवत जावे. अशा गोष्टीमुळे बरीच तात्पुरती प्रसिद्धी मिळवता येते. असे करताना एक काळजी घ्यावी ती अशी की आपल्या मराठीच्या शिक्षकांना व आपण मराठीत "ढ" आहे हे ज्यांना ठामपणे माहीत आहे अशांना आपल्या चोरलेल्या कविता आपले नावं टाकून पाठवू नये. यामुळे आपली उरली सुरली इज्जत जाण्याची दाट शक्यता आहे.
 नवख्या कविताचोरांनी या क्षेत्रात काळजी घेणे आवश्यक आहे.आमच्या कानावर आलेल्या अलीकडच्या काळात घडलेल्या काही घटना कविताचोरांच्या प्रतिष्ठेला धक्का देणाऱ्या आहेत, त्यामुळे आम्हाला उगीच चिंता वाटून राहते.यात अलीकडे काही कविताचोर यांनी कविता चोरल्यानंतर पकडले गेले आहे आणि मूळ कवीने पकडल्यावर त्यांना झापण्यात आले आहे. व बरीच नाचक्की हि त्यांच्या वाट्याला आलेली आहे, हि बाब निश्चितच स्वागतार्ह नाही, त्यामुळे असे कधी पकडले गेल्यावर भांडत बसू नये, आपण आधीच सोडून दिलेली लाज अजून थोडी सोडण्यात धन्यता मानावी, आणि आपला हेतू बेतू अजिबात तसा नव्हता किंवा अगदी अपवादात्मक चुकीने ते गैर (?) कृत्य घडल्याचे त्वरित कबुली देऊन 5 ते 10 वेळा क्षमा मागून घ्यावी व पुढे तसे काही निर्दशनास येणार नाही ही काळजी घेऊन आपला हा आदर्श धंदा चालू ठेवावा.
तंत्रज्ञान वाढल्यामुळे आणि facebook, whatsapp इत्यादी तत्सम सोसियल मीडियामुळे आपले हे कविता व साहित्यचोरीचे महान कार्य बर्याच अंशी सोपे झाले असले तरी अजून बर्याच गोष्टी या क्षेत्रात काम करणाऱ्या चोरांसाठी होणे आम्ही इष्ट समजतो.
कविताचोरांसाठी साहित्यसंमेलनासाठी शासनाने निधी उपलब्ध करुन द्यावा, उत्कृष्ट कविताचोरांना पुरस्काराने सन्मानित (इतर लोकांच्या दृष्टीने 'अपमानित') करावे, वयोवृद्ध कविताचोरांना पेन्शन द्यावे, कविताचोरास प्रोत्साहन योजना जाहीर कराव्यात इत्यादी विषयाबाबत मुख्यमंत्र्यासोबत पुढच्या आठवड्यात आमची महत्वाची बैठक असल्याने त्यात ते विषय आम्ही नक्कीच लावून धरणार आहोत.आणि त्या बैठकीत आपल्या मागण्या प्रभावीपणे कशा मांडता येतील यासाठी काही मुद्दे आम्ही मागच्याच आठवड्यात चोरुन ठेवलेले आहेत.
या शिवायही अनेक गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे त्या सर्व गोष्टी आम्ही इतर ठिकाणाहून ढापुन-ढापुन (आपल्या भाषेत संपादित करुन) आम्ही मांडत राहूच. जाता जाता एक कानगोष्ट आम्ही आपणास सांगून जात आहोत ती ही कि कविता, साहित्य यावर मनापासून प्रेम करणाऱ्या व त्याची हृदयापासून आवड असणाऱ्या लोकांनी या क्षेत्रात अजिबात पडू नये, जन्मतः हरामखोरी करण्याचा अभिजात गुण असणार्यासाठी हे क्षेत्र आहे, आपण कवी नाहीत कविताचोर आहोत याचे स्मरण हि कविताचोरांनी अधूनमधून करावे.
© राजेश खाकरे
Mo 7875438494
rajesh.khakre@gmail.com

(ता.क :- आम्ही आता लिहलेला हा लेख ही चोरीला जाण्याची दाट भीती असल्याने आम्ही आधीच तो रजिस्टर वैगरे करुन पाठवत आहोत )

siddheshwar vilas patankar

मुळात चौर्य हि एक मानवी प्रवृत्ती आहे . जी काही लोक आपापल्या पध्द्तीने जोपासतात . मलाही असाच अनुभव या माहेरघरामध्ये आला आहे . कल्पना चोरावी पण फक्त शब्द बदलून ती राशीच्या अशी पोस्ट करणे ग्राह्य नाही .
मला हा अनुभव माझ्या " निर्भयास श्रद्धांजली " या कवितेबाबत आला होता . आपण लिहीलेला लेख चोरांसाठी मार्गदर्शक ठरेल हि आशा. हे लोक  शब्द बदलून कल्पना अशीच्या अशी कशी पोस्ट करू शकतात हे ना कळणारे कोडे आहे .

सिद्धेश्वर विलास पाटणकर
सिद्धेश्वर विलास पाटणकर C