काही वेदना

Started by विक्रांत, December 22, 2016, 11:38:44 PM

Previous topic - Next topic

विक्रांत



या डॉक्टरी पेशात
पहिल्यात इतक्या वेदना
तरीही प्रत्येकवेळी दिसली
तेवढीच धारधार हरेक वेदना
मी पाहिली
देहाच्या वेदनेने
तडफडणारी माणसे
ठेचाळलेली रक्ताळलेली
थरथरणारी माणसे
घट्ट पोट धरून
डोके आवळून
विव्हळणारी माणसे 
आणि एखाद्या वोवेरान
एखाद्या बस्कोपेन
वा एखाद्या पँनफोर्टीने
स्वस्थ होणारी माणसे 
कृतज्ञतेने हसणारी
धन्यवाद देणारी माणसे
वेदनेचे हे परीहारीत होणारे रूप
देते अर्थ एक माझ्या जीवनाला .....

कधी पाहीली मी
जीवलगांच्या जाण्याने
साऱ्या विश्वाची वेदना
डोळ्यात भरून
काळीज फाटणारा
आक्रोश करणारी माणसे
या जगाची अन जगण्याची
सारी गणिते क्षणात
चोळामोळा करणारी वेदना
तिचा ईलाज तिचा उतारा
मला कधीच भेटला नाही
त्या असंख्य अनाम
आक्रोशांनी अन वेदेनेनी
भरलेले माझे हृदय
मी नेवून बुडवले
कधी संगीतात कधी सुखभोगात
किती ग्रंथात संतचरित्रात मंत्र पठणात
वेदांतात अन उपनिषदात
तरीही ती वेदना तशीच आहे
अविचल कोरडी सनातन ...

कधी मी पहिले कुणाला
कित्येक प्रहर कळा सोसतांना
तन मन पिळवटून निघतांना
जन्म मृत्यूच्या हिंदोळ्यावर
स्वत:ला लोटतांना
कुशीतील चैतन्य
जीवनात सोडतांना
अन वेदनेला आलेली फुले
अलगद वेचतांना
एक अपूर्व अनंत समाधान
पाहीले डोळ्यात ओघळतांना
अन कडेलोट होवूनही
अशी हसतांना वेदना ...

डॉ विक्रांत प्रभाकर तिकोने
http://kavitesathikavita.blogspot.in