खेळ अस्तित्वाचा..

Started by विक्रांत, December 22, 2016, 11:50:57 PM

Previous topic - Next topic

विक्रांत


****************
माझे मलाच काचती वेष राजवर्खी शेले
प्राण व्याकूळ बंदी श्वास देही जड झाले

खेळ अस्तित्वाचा जुना किती जनांनी खेळला
चार भांड्यात कोरला स्वर्ग महाल थोरला

तऱ्हा तीच आडवाटी कुणी लिहून ठेवली
पायी टोचावेत काटे रीत आखून टाकली

किती मोजाव्या पौर्णिमा दीर्घ घामट उन्हाळे 
किती दाबावेत उरी वांझ मनाचे उमाळे

कुणी पेरुनिया गेले मनी कवडसे काही 
झाड सूर्याचे अजून पण उगवले नाही

खंत कधीच ठेवली उंच बांधून आढ्याला
आता आताच भाजला मासा खारट उरला

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
Kavitesathikavita.blogspot.in


.............................