अतिरेकी

Started by विक्रांत, December 22, 2016, 11:52:40 PM

Previous topic - Next topic

विक्रांत



कश्यासाठी मरतात
ते कश्याला मारतात
अनाठायी धारणांना
उरी असे वाहतात

मेंदूमध्ये घुसलेला
कडवट परभार
धूर्त कुणी त्यात भरे
सूडाचाच तो विखार

पोटासाठी इथे कधी
कुणी होतात लाचार
दारिद्र्यी मरण्याहून 
बरा मृत्यूचा स्वीकार

मरणारा मानव नि
मारतो तोही मानव
भाऊ बाप लेक पती
उरामध्ये जपे गाव

एक मत एक पथ
इथे रे होणार नाही
धर्म अर्थ अधिकार
व्यर्थ ठरणार नाही

सांत्वनात जाणाऱ्याच्या
उरामध्ये सुरा शिरे
जळूनिया माणुसकी
जग सारे सरफिरे

तेच युद्ध तेच रक्त
उगो युगी वाहणारे
मत पिता सखी रडे
पडे उघडी लेकरे


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in