सांजवेळी

Started by sanjweli, December 27, 2016, 05:55:54 PM

Previous topic - Next topic

sanjweli

सांजवेळी
                                            १८ फेब्रुवारी 1999
             १

"त्या विरलेल्या क्षणांच्या आठवणी
मी आजही गोळा करतोय,
पिंपळपानाच्या रुपानं,
पिंपळाचं पान,वृक्ष दिसला की,
मग मला माझा भुतकाळ आठवतो."
             
              २

"जे पिंपळपान आपल्या प्रीतीचं,
प्रतीक बनलं,
त्या पिंपळाच्या शीतल छायेखाली,
आपण बसलेलो होतो,
सोबतीला नीरव शांतता होती,
अन् तेवढ्यात अचानक.......,
आपल्या पुढ्यात......,
पिंपळाचं एक पान येऊन पडलं... "
               
              ३

"तू ते उचलंस अन् म्हणालीस
"जपवुन ठेवशील ना रे हे क्षण"
अंतकरण माझं भरुन आलं होतं,
काही सुचत नव्हतं......,
पडलेलं कोडं काही केल्या,
सुटत नव्हतं..... उलगडत  नव्हतं
उगवतीचा दिस अखेर मावळला."
               
               ४

"सारं काही संपलं होतं नियतीसाठी,
पण माझ्यासाठी काहीही नाही .......,
ते क्षण मी अजुनही........
जपवुन ठेवलेत माझ्यापाशी ....... ,
तू  दिलेली एक आठवण,
म्हणुन कायमचे .....,
अजुनही तसेच.... ....,
आता फक्त त्या पिंपळपानाची ,
जाळीदार काया उरलीय..... ,
माझ्यापाशी तू दिलेली एक आठवण,
म्हणुन कायमची .....अजुनही तशीच."
               ५
"सांगण्यासारखं खुप असुनही,
मुक राहणं आता भाग आहे,
अनावर अश्रूना पापणीआड,
लोटून देउन.........,
ओठावरती हसु आणणं,
आता भाग आहे,
ओल्या आहेत या जखमा,
बुजणार त्या कधी,
त्याना लाभलेला चिरंतनाचा शाप आहे,
तरीही निर्विकार चेहरा ठेवूण,
असहाय्य वेदना सहन करणं,
आता भाग आहे,
चालता चालताच हरपून,
गेलाय रस्ता,
आता दिशाहिन भटकणं,
आता भाग आहे,
पावलांची साथ तर कधीच संपलीय,
आता इच्छा नसुनही चालणं भाग आहे"
               ६
"एक फुल होतं कोमेजलेलं.......,
कधी काळी होतं......,
ते तुझ्याही अन् माझ्याही,
मनी फुललेलं,
ते तुला जीवनाच्या सांजवेळी दिसलं,
पण आता त्याचा काय उपयोग,
तुलाही अन् मलाही.......,
कारण आपल्या संसाराची स्वप्न पाहणारी,
ती पाखरं आज,
फार दुरवरती उडून गेलीत... ,
अलग झालीयत....विलग झालीयत."
             
                  ७

"तुझ्या विरहाच्या शेकोटीत जळणारं,
माझ्या भावनांच प्रेत,
असंच अनेक कित्येक दिवस जळत राहणार,
जीवनात मी जे सत्य मानलं,
स्वत:च एक स्वप्न पाहीलं,
ज्याच्यावर मी मनापासनं प्रेम केलं,
ज्याच्यासाठी मी हसलोही अन् रडलोही,
तेच सत्य आता खोटं ठरलंय."
                 ८
"वसंताचा वसंतबहार मी पाहीला होता,
पण होरपळवणा-या या ग्रीष्माची मला जाणीव नव्हती,
तू नाहीस म्हणुन,
जीवनाचा प्याला केव्हांच रिता झालाय,
ती कैफ, ती धुंदी आता फक्त,
मरणाची वाट पाहण्यात उरलीय,
तुझ्या अंगावरती अक्षता पडत होत्या,
अन् मीच निमुटपणे त्याच मांडवात,
उभा राहून हे सगळं........ ,
माझ्या स्वत:च्या उघड्या डोळ्यानी पाहत होतो,
का? केवळ तुझ्यासाठीच ना.....  ."
             ९
"मी रंगवलेल्या स्वप्नांच्या,
छिन्नविच्छीन्न चिंधड्या उडत होत्या,
तू एका वेगळ्या जगात जाणारं होतीस......,
अन् गेलीस सुद्दा......,
माझं तर जगच बदललं होतं,
दिवस न रात्र कळत नव्हती,
वर्षानुवर्ष अशीच निघुन जात होती,
मी मात्र माझ्या वास्तवात होतो,
पण तू किती पुढे निघून गेली होतीस,
माझ्या विश्वापासनं..... ......."
       
१०

"तू नाहीस म्हणुन जीवनाचा प्याला
केव्हांच रिता झालाय,
ती धुंदी,तो कैफ,आता फक्त
मरणाची वाट पाहण्यात उरलीय,
यौवनाच्या खिडक्या बंद झाल्या होत्या,
अन् वार्धक्याची कवाडं सताड उघडली होती,
"ज्या हातात एकेकाळी तुझा हात होता,
त्याच हातात एक निर्जीव काठी आली होती,
तीचा आधार घेत थरथर कापणारं,
माझं शरीर मरण येत नाही म्हणुन जगत होतं,
या एकांतात तिच्याशिवाय आधार देणारं,
दुसरं असं कुणीच नव्हतं....... ."

        ११

"अन् अश्या जीवनाच्या सांजवेळी तू  भेटलीस,
मन किती प्रफुल्लित झालं होतं,
एक वेगळंच समाधान कित्येक,
वर्षानंतर मनास भेटलं होतं,
गालावरती तुझ्या सुरकुत्या पडल्या होत्या,
कपाळाच्या मधी असणारं
ते दुस-याचं कुंकू आता तुझ्या कपाळी नव्हतं............ ."
           
    १२

"जीवनभर मी एकटा होतोच अन् आहेही,
शेवटी तुलाही नियतीनं एकाकी केलं,
तुझ्या पतीचा बळी घेऊन,
वासनेनं भिरभिरलेल्या अनेक,
समाजकंटकी गिधडांच्या नजरा,
तुझ्या देहा भोवती खिळल्या होत्या,
पण त्यातुनही वाट काढून तू मात्र,
पुढे आलीस अन् त्याच समाजाला,
दाखवून दिलंस की,
तू एक अबला नाहीस,
सबला आहेस............"

           १३

"वैधव्यानं ग्रासलेल्या स्रीयांना आपल्या केलंस,
त्यांना स्वत:च्या प्रेमाचा ओलावा दिलास,
अनाथांची नाथ झालीस,
त्यांची आई झालीस,
प्रसंगी कठोरही बनलीस,
रणरागिणीचा अवतारही धारण केलास,
ज्या समाजानं तुझी अन् माझी ताटातूट केली,
जात,धर्म, पंथाची दुषणं उभी केली,
त्याच समाजावरती परोपकार केलास,
आंतरजतीय विवाहाचा पायंडा घातलास,
कित्येकांचे मोडलेले संसार उभे केलेस,
मलाही नाही विसरलीस......... ."

              १४
     
"प्रेमाच्या पुढेही फार दुरवरती जाऊन बसलीस,
सामान्यातून असामान्य बनलीस,
अशाच एका जीवनाच्या सांजवेळी,
तू गेलीस मला सोडुन कायमच्,
मातीचं मडकं सागरात बुडालं,
अन् शेवटी मातीला जाऊन मिळालं......."
     
              १५

"तुझ्या प्रतिमेस हार घालताना,
हात माझे थरथरत होते,
डोळे तुझे मला तुझ्या संगतीस,
बोलावत होते,
इथं मात्र नियतीनं मला साथ दिली,
मी ही तुझ्या विश्वात आलो,
पुन्हा कधीच न परतण्यासाठी,
खरंच जीवनात मी जे एक सत्य मानलं,
स्वत:च एक स्वप्न पाहीलं,
ज्याच्यावरती मी मनापासनं प्रेम केलं,
ज्याच्यासाठी मी हसलोही अन् रडलोही,
ते सत्य या जीवनानंतर वास्तवास व पुर्णत्वास आलं. "

©-महेंद्र विठ्ठलराव गांगर्डे पाटील
९४२२९०९१४३