"ती" सध्या काय करते...

Started by swapnil.huddar, January 05, 2017, 03:51:34 PM

Previous topic - Next topic

swapnil.huddar

"ती" सध्या काय करते...

वाऱ्याची मंद झुळूक माझ्या मनापाशी थांबून रोज विचारते,
सांग ना रे मला, ती सध्या काय करते...

कुणासाठी झुरत असेल ती,
कि माझ्या आठवणी जपत असेल ती ?
हास्याचा मुखवटा ओढून,
माझ्या नसण्याने रडत असेल ती ?
विसर तिचा नाही पडत, गेल्यावरही ती मला माझीच दिसते...
सांग ना रे मला, ती सध्या काय करते...

तिला नसेल वाटत का,
सारा प्रपंच सोडून माझ्यापाशी यावं...
उरलेलं आयुष्य स्वतःचं,
बेभान होऊन माझ्यापाशी द्यावं...
झोपण्या पूर्वी एखादा क्षण तरी, ती जरूर माझी वाट पाहते...
सांग ना रे मला, ती सध्या काय करते...

बघावसं वाटतं तिला,
दिवसभर अगदी जवळ घेऊन...
स्पर्श करण्याची होते मग इच्छा,
ओठ अलगद गालावर ठेऊन...
स्वप्न बनून राहतात माझ्या साऱ्या इच्छा, स्वप्नही मग कुठेतरी हरवून जाते...
सांग ना रे मला, ती सध्या काय करते...

शेवटी तिला एकच कळवा,
मी काहीतरी तिचं चोरून आणलंय...
शोधू नकोस म्हणावं,
जितकं होतं ते भर भरून आणलंय...
बघू, तिचं प्रेम मागायला तरी माझ्याजवळ येऊन बसेल का,
हट्ट करत माझ्यापाशी, मनसोक्त हसेल का...
सवय आहेच तिची, अशीच नेहमी छळते,
सांग ना रे मला, ती सध्या काय करते...