सरवा

Started by sanjay limbaji bansode, January 06, 2017, 11:11:13 AM

Previous topic - Next topic

sanjay limbaji bansode

सरवा

आपल्या चिमुकल्यांना झोपडीतच ठेऊन
ती निघाली
ग्रीष्माच्या तप्त उन्हात
रानात सरवा वेचायला.

भोंगळ्या पायांने ती घालत होती
रान ना रान पालथं

त्या सळसळत्या उन्हात
पक्षांच्या नजरेतून चुकलेली
गव्हाची ओंबी उचलून,ओटीत टाकत
जात होती पुढं पुढं
तहान भुकेची पर्वा न करता.

घारी पेक्षाही तीक्ष्ण नजरेने
ती वेचत होती एक ना एक दाणा.
डोक्यावर आलेला सूर्य
तिच्या अंगाचं साल्टं काढीत होता
ग्रीष्माच्या तप्त उन्हाने जळत असलेली जमीन
तिच्या पायाचे चामड़ सोलीत होती.

छे छे !
याच्या तिला वेदना होतच नव्हत्या
कारण,
तिच्या पोटाच्या आगीपुढं ही आग शून्यच.

जमा केलेला सरवा
एका झाडाखाली बसून तिनं कूटला, उपनला
अन् पसाभर जमा झालेले दाणे
लक्तरात गुंडाळून ती निघाली परतीला
स्वतः  पेटून
तिच्या चिमुकल्यांची अन् तिच्या पोटाची आग विझवायला !

संजय बनसोडे 9819444028