दिसत नसेल आरशात

Started by Minal Kulkarni, January 17, 2017, 12:50:05 PM

Previous topic - Next topic

Minal Kulkarni

दिसत नसेल आरशात पण....

दिसत नसेल आरशात पण
आता वय होत चाललयं....
केस असतील काळेभोर
मन मात्र पांढरंफटक पडलयं...

डोळे झालेत अधू
नाही वाचता येत कोणाच्या
चेह-यावरचे भाव
हात घेता येतो हाती
नाही ओळखता येत
कोणाच्या मनाचा ठाव
माझ्या ओळखीच जगचं
कदाचित धूसर होत चाललयं...
दिसत नसेल आरशात पण....

शब्द ही तोलून मापूनच
पडतात कानावर
गर्भितार्थ कळत असतात
पण मी नाही घेत मनावर...
मनही जाणिवनेणिवेच्या
पलिकडे जात चाललयं....
दिसत नसेल आरशात पण....

जग बदलतयं ?
की मी बदलते आहे ??
का दोघेही? ??
परस्पर विरुद्ध दिशेने....
नाही का जोडता येणार आम्हाला
एकाच व्यासरेषेने ??
आमच्यातलं साम्य फारच
पुसट होत चाललयं...
दिसत नसेल आरशात पण....

वर्तमानापेक्षाही आता
भूतकाळातच मन जास्त रमतय...
काळामागे धावताना
खरतरं खूप दमतयं...
नसलेल्या क्षणांना उगाच
सोबत घेत चाललयं....
दिसत नसेल आरशात पण....
आता वय होत चाललयं....
            - मीनल