पाचोळा

Started by rhtbapat, January 17, 2017, 04:14:55 PM

Previous topic - Next topic

rhtbapat

आयुष्याच्या क्षितिजावर , कधी संध्याकाळी
कधीतरी तो ,  मला काहीतरी शोधताना दिसतो
मी त्याला विचारत नाही , असच काहीस तो हरवून बसलाय

कधी पहाटे तो देवाजवळ ,
एकटाच काहीतरी मागत असतो ,
वर्षामागून वर्ष गेली तरीही तो रडत असतो
असं खूप जवळच काही गमावून बसलाय ,
पण मी त्याला विचारत नाही
असच काहीसं तो हरवून बसलाय

काही जण म्हणतात असं , काही म्हणतात तसं
पण तो मात्र गोष्टी सांगत फिरतो ,
सुख – दुखाच्या , मनातल्या गावातल्या ..
पण आयुष्याचे शब्द वेचता वेचता
इतिहासाच फाटलेल पान होऊन बसलाय
मी त्याला विचारत नाही
असच काहीसं तो हरवून बसलाय

मला वाईट वाटायचं ..
जेव्हा तो एकटाच बसतो कधी नदीकाठी
थोडा देवावरही रागावतो ,
मग समजलं की, आयुष्याची कागदी होडी
तो त्या नदीतच सोडून बसलाय
मी तरी त्याला काय विचारू ,
असच काहीसं तो हरवून बसलाय

असं म्हणतात त्याने ऐकलं, जेव्हा सगळे बोलत होते
तो बोलायला गेला तेव्हा वेळच  ऐकत नव्हती ,
मी ऐकायला गेलो, पण तो शुष्क डोळ्यांमध्ये
सारे शब्द ,सारे स्वर गिळून बसलाय ,
मी त्याला विचारात नाही ,
असच काहीसं तो हरवून बसलाय

त्या झाडावर यायची कधी फुलं
अन सावलीही होती त्याची ,
आपल्या कर्तृत्वाची गाणीही
ताठ मानेने गायचा तो कधी ,
वाऱ्याशी झुंजता झुंजता
तो फक्त 'पाचोळा' होऊन बसलाय ,
मी तरी त्याला काय विचारणार ,
असच काहीसं तो हरवून बसलाय

आजही तो दिसतो ..
मान खाली घालून चालत असतो ..
मी स्वतालाच विचारतो
जग त्याला विसरलय की,
तो ' पाचोळा ' सगळ्या रानाला वाळीत टाकून बसलाय ?
आता मात्र त्याला विचारावस वाटत नाही ,
असच काहीसं तो हरवून बसलाय..


- रोहित बापट

टीप : ही माझीच कविता आहे. या कवितेचं वाचन मी युट्यूब वर सुद्धा पोस्त केलेलं आहे
https://www.youtube.com/watch?v=zUwK7QD3YdY

Minal Kulkarni

खुपच सुंदर :)👍

rhtbapat