लोकशाहीचा सुगंध

Started by Akshay Aiwale, February 26, 2017, 10:09:41 AM

Previous topic - Next topic

Akshay Aiwale

मी खणत होतो खड्डा
माझ्या घरासमोर
माझ्याच मरणाचा
तिकडून धुरळा उडवीत
पांढऱ्यां कपड्यांतील
काळे कावळे फडफडतच आले
मी टाकला कटाक्ष, तुच्छतेचा..
त्यांनी केलं स्मितहास्य, भयाण..
त्यांनी नमस्कार केला,
मला चमत्कार वाटला नाही..
ते नजीक आले
मला दूर जावंसं वाटलं नाही..
खिशात माझ्या पाकीट आलं
भ्रष्टतेचा दर्पही खिशातूनच आला
नवी कोरी भाकरी
त्या पाकीटातून येणार होती
पण त्या पाकीटाचा दर्प माझ्या
घर्मगंधात मिसळू शकला नाही
अरेरे ! तो तर लोकशाहीचा सुगंध होता...

- अक्षय ऐवळे