शब्दरांजण

Started by Jueli, March 12, 2017, 11:28:54 AM

Previous topic - Next topic

Jueli

शोधत होते मी
कवितेच्या वह्या,
कागदांचे गठ्ठे ,
शब्दांचे ढिगारे..
जसजसा वेळ निसटत होता,
मी वेडीपिशी होत होते.

एका कवितेत,
दुसऱ्या कवितेच्या तिसऱ्या ओळीत,
तिसऱ्या कवितेच्या चौथ्या शब्दात,
अस्वस्थतेत शोध सुरूच होता माझा..

शाईच्या दौती सांडून झाल्या,
अलंकाराची आभूषणे काढून झाली,
विरामचिन्हे पाठीशी टाकून झाली,
कागदाच्या पारव्याने काळे पंख लेऊन झाले,
जमिनीने काळ्या रंगाचा सडा पडलेला पाहिला,
सडा,
नैराश्याचा,
अशांततेचा,
अस्तित्वहीनतेचा,
अन् असहायतेचा...

आता माझा धीर सुटत चालला होता,
मला कुठेच का मिळत नाहीये ?
सगळंच तर शोधून झालंय,
प्रत्येक गोष्ट पाहून झालीये,
कविताही धुंडाळून झाल्यात,
मग गेलं कुठे ?
काय?
अच्छा, मी काय शोधतेय विचारताय?
मी शोधतेय,
माझं "शब्दरांजण"