बळी राजा !

Started by Asu@16, March 26, 2017, 02:32:09 PM

Previous topic - Next topic

Asu@16

     बळी राजा !

होते माझे शेत सुंदर
हिरवे हिरवेगार.
झुळझुळ, झुळझुळ झऱ्याकाठी
स्वर्गाचे द्वार.

बांधावरती चिंच हिरवी
आंबट, तरी किंचित बरवी.
निंब कडू डेरेदार
परि, मधु निंबोळ्या भरदार.

बोरवनाचे कंटक कुंपण
बोरांचे परि देई आंदण.
गहू जोंधळा, तूर हरभरा
करडई कापूस, धन्य धरा !

येता डोईवर बिंब
अंगी घामाच्या धारा.
पोटी भुकेचा डोंब
देई न्याहारीचा हाकारा.

शिळी भाकरी चटणी
आणि आचाराची फोड.
पक्वान्नाचे काय !
लागे अमृताहुनि गोड.

कवडीमोले माय गेली
गेले मम घरदार.
रागवू आता कुणाकुणावर ?
नशीब असे गपगार.

होते माझे शेत सुंदर
हिरवे हिरवेगार.
झाले आता उद्यमनगर
काळे काळेशार.

बैलं माझी काळी कलंदर
शिंगी शोभे शेंदूर सुंदर.
घोगर, घंटा, पायी पैंजण
माथ्यावरती शुभ्र गोंदण.

होते बैल माझ्या पदरी
होतो मी बळीराजा
मीच आता बैल नगरी
झालो बळी, राजा !

- अरूण सु. पाटील

https://www.facebook.com/AsuChyaKavita