कवितेचे पीक

Started by Asu@16, May 29, 2017, 12:28:28 AM

Previous topic - Next topic

Asu@16

     कवितेचे पीक

ढगातून सरसर
सरी कोसळतात
मनातून झरझर
ओळी झिरपतात.
कवितेचे येते, पीक भरपूर
गाड्याभरून कविता, दिसती सर्वदूर.
कविता येतात बाजारात
चोहीकडून हजारात
भाव मग जातात पडून
आणि कविता जातात सडून.
कवी बिचारा कण्हून.
सांगणार तरी कुणाला !
भाव बांधून द्या म्हणून.
कधी कधी कवी रडतो
आणि रडण्याचीही कविता करतो.
कविता प्रसवणे, ही तडजोड असते
मन भावनांची तडफड असते
तारावे की मारावे, तुमच्या हाती असते.
भाव असलेल्या कविता
भाव खाऊन जातात.
अभाव असलेल्या कविता
अभावानेच खपतात.
तरीही कवी, कविता पिकवित असतो
जसा, भाव नसला मालाला तरी,
शेतकरी पिकवित बसतो.
शेतकर्‍याचा अंगात, शेती जशी असते
कवीच्या हृदयात, कविता तशी वसते.

- अरूण सु.पाटील

https://www.facebook.com/AsuChyaKavita