दिसे दिगंबर

Started by विक्रांत, May 29, 2017, 10:56:35 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

दिसे दिगंबर
********** -

जेव्हा अंतरात
दिसे दिगंबर
सगुण साकार 
होवूनिया ||

जयास भेटता
सरतात व्यथा
जीवनाच्या गाथा
तरतात ||

तोच तो आनंद
सुख समाधान
करता साधन
कळो येई ||

शोधता सापडे
रडता हरपे
कळताच लोपे
जन्म काज ||

कर एक देशी
मनाचे ते ठाण
राही सावधान
क्षणोक्षणी ||

म्हण दिगंबर
कृष्ण गजानन
ॐकार संपूर्ण
सर्वव्यापी ||

कळेल जगत
सुख दु:खातीत
मायेचे गणित
समजेल ||

विक्रांत संतांना
शरण जावूनी
अंतरी निवूनी
ऐसा गेला ||

विक्रांत प्रभाकर तिकोणे
**********************